जयगड समुद्रात भरकटलेली मुंबईतील नौका आठ तासांच्या बचाव कार्यानंतर बंदरावर सुरक्षित

रत्नागिरी : जयगड समुद्रात सोमवारी मध्यरात्री भरकटलेली मुंबईतील मच्छिमारी नौका सुमारे आठ तास चाललेल्या या ऑपरेशननंतर जयगड बंदरात आणण्यात यश आले. 11 नॉटीकल मैल अंतरावर खोल समुद्रात बिघडलेल्या मुंबईतील विजया महेश्वरी नौकेला किनाऱ्यावर सुरक्षित आणण्यासाठी रात्रभर ऑपरेशन सुरु होते. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय त्री. उगलमुगल यांच्या मार्गदर्शनाखाली जेएसडब्ल्यू पोर्टचे प्रमुख, तटरक्षक दल आणि पोलिसांचे सागरी सुरक्षा दल आणि जिल्हाप्रशासनाने यात महत्त्वाची भुमिका बजावली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर वेगवान वारे वाहत आहेत. समुद्रही खवळलेला असल्याने मच्छीमारीत व्यत्यय येत आहे. सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलाला एक मच्छीमारी नौका खोल समुद्रात अडकुन पडल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश रामभाऊ दळवी यांनी तात्काळ ही माहिती मेरीटाईम बोर्डाचे कॅ. संजय उगलमुगले यांना दुरध्वनीवरुन ही माहिती दिली. मुंबई येथील विजया महेश्वरी या मच्छीमारी नौकेचे रात्रीच्या सुमारास अचानक इंजिन बंद पडले. नौकेवर तांडेलांसह अकरा खलाशी होते. त्यांनी खोल समुद्रातच नांगर टाकून मदतीसाठी प्रयत्न सुरु केले होते. चक्रीवादळामुळे समुद्रही खवळलेला होता. पाण्यात नौका हेलकावे खात होती. नांगरावर जास्तकाळ नौका उभी राहणेही धोकादायक ठरली असती. अनर्थ टाळण्यासाठी नौकेवरील तांडेल सुदेश दाभी यांच्याकडून मदतीसाठी प्रयत्न सुरु केले होते. सागरी सुरक्षा दलाकडून संदेश मिळाल्यानंतर कॅ. उगलमुगल यांनी तत्काळ मदतीसाठी पावले उचलली. तटरक्षक दलाचे कमांडन्ट आणि जेएसडब्ल्यूचे कॅ. रविचंद्रन यांच्याशी संपर्क साधला. तटरक्षकची नौका घटनास्थळाकडे रवाना झाली. पाठोपाठ नौका ओढून आणण्यासाठी आवश्यक असलेली जेएसडब्ल्यूची टग बोट तिकडे पाठविण्यात आली. तोपर्यंत मध्यरात्र झालेली होती. वाऱ्याचा वेगही वाढला होता. लाटांमुळे घटनास्थळी पोचण्यात अडथळे होते. या प्रतिकुल परिस्थितीमध्ये मच्छीमारी नौकेच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा कार्यरत होत्या. इंजिन बंद पडल्यामुळे टग बोटीच्या साह्याने विजया महेश्वरी नौका मंगळवारी (ता. 19) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जयगड येथील महाराष्ट्र मेरी टाईमच्या जेटीला आणून सुरक्षित उभी करण्यात आली आहे. सध्या ती नौका आणि खलाशी जयगडे येथे सुरक्षित असल्याचे कॅ. उगलमुगले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here