शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ‘एसएलबीसी’ची बैठक तातडीने बोलवा : फडणवीस

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक तातडीने बोलाविण्यात येऊन तसे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेच्यामार्फत द्यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्णत: ठप्प झालेली आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तर नगण्य झाली आहे. राज्यात केवळ 19 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याचे आपल्याच दि. 22 मे 2020 रोजीच्या शासकीय आदेशात नमूद आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्ज दिसत असल्याने त्यांना नवीन कर्ज सुद्धा मिळणार नाही आणि परिणामी आगामी खरीप हंगामाला सामोरे जाताना त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. अशा शेतकऱ्यांना खरीपाचे कर्ज देण्यासाठी बँकांनी ‘शासनाकडून येणे बाकी’ असे दाखवण्याबाबत आपण जीआर काढला आहे. मात्र, असे जीआर काढून उद्देश सफल होईल, याची शक्यता कमीच आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ देण्यासाठी तात्काळ एसएलबीसी ची बैठक बोलावावी आणि सर्व बँकांना विश्वासात घेऊन याबाबतची कारवाई करावी लागेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:04 AM 25-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here