खरीप भातलागवडीबद्दलच्या आयोजित केलेल्या चर्चासत्राला प्रतिसाद

रत्नागिरी : रत्नागिरी भात संशोधन केंद्र, शिरगाव, रत्नागिरी, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, रिलायन्स फाउंडेशन आणि चिपळूण पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने खरीप भातलागवडीबद्दल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या अनुषंगाने शेती करताना खरीप भातशेती कशी करावी, याबाबत शेतकऱ्यांना घरबसल्या मार्गदर्शन मिळावे, यासाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चिपळूण तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ झाला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन माने यांनी यावेळी आवाहन केले की, आधुनिक तंत्रज्ञांच्या माध्यमातून रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने भातशेतीच्या लागवडीची माहिती घेऊन करोनाच्या काळात कोकणातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने भात लागवड करून जास्तीत जास्त भाताचे उत्पादन करावे. तसेच पुणे-मुंबईवरून आलेल्या चाकरमान्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदतीचा हात द्यावा. शिरगाव (रत्नागिरी) येथील भात संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. भात लागवडीसाठी जमिनीची मशागत कशी करावी, आपल्या प्रभागांनुसार वाणाची निवड कशी करावी, विविध भातवाणाच्या लागवडीचा कालावधी आणि त्याची योग्य नियोजन याची माहिती त्यांनी दिली. पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी सुनील गावडे आणि बी. बी. पाटील यांनी भातलागवडीच्या विविध शास्त्रीय पद्धती, भात लागवडीनंतरचे नियोजन, खत व्यवस्थापन, रोपवाटिका नियोजन, भात संशोधन केंद्रामार्फत विकसित केलेल्या भाताच्या विविध वाणांची माहिती करून दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भात लागवड करताना शारीरिक अंतर कसे राखावे, शेतातून काम करताना व करून आल्यावर आपली वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी, याची माहिती उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर यांनी दिली. रिलायन्स फाउंडेशनचे कृषी तज्ज्ञ सचिन मताले यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. दरम्यान, शेतीविषयक तसेच पशुपालनाविषयी तांत्रिक माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या १८००४१९८८०० या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर रविवारव्यतिरिक्त इतर दिवशी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन रिलायन्स फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here