सिंधुदुर्गात लवकरच शासकीय वैद्यकीय महाविदयालय; खा. विनायक राऊत यांचा पाठपुरावा

सिंधुदुर्ग : कोव्हीड लॅबच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा केली होती. खासदार विनायक राऊत यांनी त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आता जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सेवांचा अभाव पाहता विशेषत: अपुरी असलेली डॉक्टरांची संख्या विचारात घेता त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे अतिशय आवश्यक आहे. गेली ५ वर्षे सर्वच शिवसेनेचे लोकप्रतिनिधी त्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे यांच्या हाती राज्याचे नेतृत्व आल्यानंतर सिंधुदुर्गवासियांची ही मागणी पूर्ण होईल अशी खात्री झाली होती. काही दिवसापूर्वीच कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या RTPCR लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ठाकरे यांनी जिल्हयांतील जनतेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. तोच धागा पकडून खा. राऊत यांनी ठाकरे यांना लेखी पत्राद्वारे सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणेबाबत विनंती करताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी तात्काळ वैद्यकीय शिक्षण संचालन यांना या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होवून जिल्हावासियांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे. ठाकरे सरकारच्या माध्यमातून सत्तेवर येताच संपूर्ण कोकण विभागाला झुकते माप मिळत आहे. त्यामुळे कोकणचा रखडलेला विकास आता ठाकरे सरकारच्या माध्यमातून पूर्ण करुन घेण्यासाठी शिवसेनेचे सर्व शिलेदार प्रयत्न करीत आहेत. खा. राऊत यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दिलेल्या प्रतिसादाबद्दल खा. राऊत यांनी जिल्हयाच्या वतीने ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:56 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here