कोकणात कोळंबी संवर्धन प्रकल्प राबवून तरुणांना रोजगार देणार : आ. निकम

चिपळूण : कोकणातील खारट जमीन व मचूळ पाण्यात पांढरी कोळंबी संवर्धन केले तर इथल्या तरुणांना स्वयंरोजगार मिळू शकेल व कोकणचा आर्थिक स्तर उंचावेल, या पार्श्वभूमीवर चिपळूण विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी शनिवारी नरसोबाचीवाडी येथील कुरुंदवाड येथे अरुण आलासे यांच्या कोळंबी संवर्धन प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली. अरुण आलासे हे २०१३ पासून पांढरी कोलंबी प्रकल्प राबवित आहेत व त्यात ते यशस्वी झाले आहेत, ही माहिती कळताच आ. निकम आपले सहकारी प्रदीप निकम, फिशरीज कॉलेजचे डॉ. सुधाकर इंदुलकर, कोल्हापूरचे निवृत्त मत्स्य अधिकारी अनिल चिले, अमित सुर्वे यांच्यासह नरसोबाचीवाडी येथे पोहोचले व त्यांनी खाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धनाची सविस्तर माहिती घेतली. ही पांढरी कोळंबी खाऱ्या पाण्यात होते. कोकणातही काही ठिकाणी क्षारपड जमीन आहे तर मचूळ पाणीही आहे. त्यामुळे अशा प्रकल्पाला चालना दिली तर कोकणातील तरुणांना रोजगाराची एक नवी संधी निर्माण होईल, त्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आ. निकम यांनी या वेळी सांगितले. आलासे यांनी आ. निकम व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले व या प्रकल्पाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आपण आलासे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात अशा पद्धतीने पांढरी कोळंबी संवर्धन प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करू, असे आ. निकम या वेळी म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:27 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here