गृह निर्माण सोसायटीच्या अध्यक्षाचा मनमानी कारभार; महिलांची पोलीस स्थानकात धाव

रत्नागिरी : शहरानजिक ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका नामांकित गृह निर्माण सोसायटीच्या अध्यक्षाच्या कारभाराचा प्रचंड ताप सोसायटीतील सदनिकाधारकांना सहन करावा लागत आहे. अध्यक्षाच्या मनमानी कारभाराला वैतागुन अखेर येथील महिलांनी रविवारी थेट ग्रामीण पोलीस स्थानक गाठले. शहरातील नावाजलेल्या बिल्डरकडून रत्नागिरी शहरानजिक एक छोटे शहर या नावाने गृह निर्माण सोसायटी उभी करण्यात आली आहे. सुरुवातीला सोसायटीत पाण्याची खुप समस्या होती. सुरुवातीला बिल्डरकडून टँकरने पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी महिन्याला लाखो रुपयांचा भुर्दंड पडू लागल्याने संबंधित बिल्डरने सोसायटीसाठी स्वतंत्र विहीर पाडून पाण्याचा प्रश्न निकाली काढला. मात्र सोसायटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्यापासून नाहक त्रास देण्याचीच भूमिका बजावणाऱ्या त्या अध्यक्षाने सोसायटीला विहिरीचे पाणी न सोडता टँकर ने पाणी पुरवठा सुरू ठेवला. टँकरच्या पाण्यासाठी सदस्यांकडून महिना 300 रुपये घेतले जात होते. मात्र टँकर चालकाचे पैसे थकल्याने टँकर चालकाने पाणी पुरवठा बंद केला. रविवारी पाणी न आल्याने महिलांनी अध्यक्षांकडे विचारणा केली यावेळी अध्यक्ष यांनी महिलांना उलटसुलट उत्तर दिल्याने महिलांनी थेट ग्रामीण पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. यापूर्वी या अध्यक्षा विरोधात जिल्हा उप निबंधक यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली होती. उप निबंधक यांनी संबंधित अध्यक्षा विरोधात कारवाई देखील केली. मात्र आपलं कुणी काहीच करू शकत नाही या अविर्भावात असलेल्या या अध्यक्षा विरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here