शहरातील वाहतूक नियंत्रण यंत्रणा केवळ महसुलासाठी : अॅड. पटवर्धन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील वाहतूक नियंत्रण यंत्रणा केवळ महसूल गोळा करण्याचे काम करत आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे. शहरात वाहतूक नियंत्रण यंत्रणा केवळ हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना दंड लावण्यासाठी आहे का, असा प्रश्न जनतेला पडत आहे. करोना लॉकडाउनच्या काळातही दीड कोटीचा दंड वसूल झाल्याची बातमी सर्वत्र झळकली. शहरातील बाजारपेठांमध्ये बेशिस्तीत पार्क केलेल्या गाड्या, नाक्यांमध्ये वाहनांच्या गर्दीने होणारी वाहतूक कोंडी, मोक्याच्या दुकानांसमोर बेशिस्तीत उभी केलेली वाहने, रिक्षा या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे काम यंत्रणेकडून केले जात नाही. दुचाकीचालकांना हेल्मेट अत्यावश्यक ही कायद्यातील एकमेव तरतूद आहे आणि त्या तरतुदीची अंमलबजावणी सुरू आहे, असे चित्र आहे, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. पार्किंग, गाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी, विशिष्ट दुकानांसमोर थांबलेली वाहने यामुळे खूप अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यासंदर्भात लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदन सादर करण्यात येईल आणि रत्नागिरी शहरातील वाहतुकीवर योग्य नियंत्रण ठेवून शहरातील वाहतुकीचे प्रश्न निकाली काढावेत, अशी मागणी करण्यात येईल, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:24 AM 30-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here