हर्णै येथील तलाठी, कोतवाल यांच्या विभागीय चौकशीचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे

दापोली : चक्रीवादळातील भरपाई देण्यासंदर्भात हर्णै येथील तलाठी आणि कोतवाल यांनी अनियमितपणा केल्याबाबतची चौकशी तालुका स्तरावर पूर्ण झाली असून त्याबाबतचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी ही माहिती दिली. चक्रीवादळाने दापोली, मंडणगड तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांचे अपरिमित नुकसान झाले. त्याचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले. मात्र दापोली तालुक्यातील हर्णै येथील पंचनामे चुकीच्या पद्धतीने आणि खोटे केल्याचा आरोप झाला. त्यानंतर तेथे ७८ ठिकाणी फेरपंचनामे करण्यात आले. त्यापैकी तीस व्यक्तींना पहिल्या टप्प्यात पैसे देण्यात आले होते. परंतु इंजिनिअरना त्यातील २४ पंचनामे चुकीच्या पद्धतीने केलेले आढळून आल्याने ते पंचनामे अपात्र ठरवण्यात आले. त्या २४ जणांना नोटीस देऊन शासनाचे पैसे परत देण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार २२ जणांनी पैसे परत केले. मात्र दोन व्यक्तींनी अजूनही पैसे परत दिलेले नाहीत. त्यांच्याकडून जमीन महसूल थकबाकी म्हणून पैसे वसूल करावेत आणि त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये, अशी नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणात हर्णै येथील तलाठी आणि कोतवाल यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी पूर्ण करून तो दापोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. त्या दोघांना निलंबित करावे किंवा त्यांची बदली करावी, अशी शिफारस प्रस्तावात करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:42 AM 30-Jun-2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here