पुतिन हे २०३६ पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहणार ?

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची अध्यक्षपदाची मुदत २०२४ मध्ये संपत असून, या मुदतीनंतर त्यांना पुन्हा निवडणूक घेण्यास परवानगी देणाऱ्या घटना दुरुस्तीच्या बाजूने रशियन जनतेने कौल दिला आहे. पुतीन यांना राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी रशियाच्या घटना दुरुस्तीला रशियातील मतदारांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील १६ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर कायम राहण्याचा पुतीन यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता पुतीन हे सोव्हिएत रशियाचे माजी प्रमुख जोसेफ स्टालिन यांच्यापेक्षाही अधिक काळ सत्तेवर असणारे नेते होणार आहेत. जवळपास आठवडाभर घटनादुरुस्तीसाठी मतदान सुरू होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर मतदान करण्यात आले. यामध्ये ७७ टक्के लोकांनी घटनादुरुस्तीच्या बाजूने आपला कौल दिला. या घटना दुरुस्तीमुळे पुतीन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रत्येकी सहा वर्षाच्या दोन टर्म पूर्ण करता येणार आहे. घटना दुरुस्ती न झाल्यास पुतीन यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपुष्टात येणार असून त्यानंतर त्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही. ही घटना दुरुस्ती मंजूर करण्यासाठी पुतीन यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. भविष्यातील देशासाठी आपण मतदान करत आहोत. आपण आपल्या मुलांकडे एका भक्कम देश सुपूर्द करणार आहोत, या विचारानेच मतदान करण्याचे आवाहन पुतीन यांनी केले होते. पुतीन यांनी जानेवारी महिन्यात घटना दुरूस्तीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर पुतीन यांच्या सांगण्यावरून पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी राजीनामाही दिला होता. यानंतर पुतीन यांनी कमी राजकीय अनुभव असलेल्या मिखाईल मिशुस्टिन यांना पंतप्रधान केलं. २००८ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते अलेक्सेई नवालनी यांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणून पुतीन यांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने नवलनीला एका प्रकरणात दोषी ठरवत त्यांची उमेदवारी रोखली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here