मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीला लवकरच निधी देणार : जिल्हाधिकारी

0

रत्नागिरी : मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या मंजुरीसह निधी लवकरात लवकर देणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांना दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. जाकीमिऱ्या पाटीलवाडी आणि शेट्येवाडी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकरिता प्रस्तावाप्रमाणे आवश्यक निधी लवकरात लवकर मंजूर करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मिर्‍या बंधारा दुरुस्तीला निधी मिळण्याकरिता मिऱ्यावासीय जिल्हाधिकारी कार्यालयावर १४ ऑगस्ट रोजी धडकणार होते. मात्र जिल्हा नियोजन मंडळाची सभा आणि स्वातंत्र्यदिन या पार्श्वभूमीवर ही भेट पुढे ढकलण्यात आली होती. काल मिऱ्यावासीयांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना भेटले. यावेळी माने, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विकास सावंत, भाजप जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत यांनी वस्तुस्थिती मांडली. उधाणाची भरती येत असल्याने व तिथेच बंधारा वाहून गेल्याने ग्रामस्थ भयभीत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजनमधून जानेवारीत मंजुरी मिळूनही निधी उपलब्ध होऊन दुरुस्ती सुरू न झाल्याने ग्रामस्थ नाराज होते. त्यासाठी निधी तत्काळ मिळून काम सुरू व्हावे, याकरिता माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते. बंधारा दुरुस्तीसाठी ९९.७५ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मिऱ्या येथे सुमारे साडेतीन किमी लांबीचा टेट्रापॉड्स व ग्रोयनचा धूपप्रतिबंधक बंधारा करण्याबाबत मार्च २०१९ मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विभागाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८९.६७ कोटीच्या रकमेला प्रशासकीय मान्यता दिली होती. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केली, यासंदर्भातही माने यांनी चर्चा केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:12 AM 18-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here