बावनदीत दोन युवकांचा बुडून मृत्यू

0

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील दोन युवक पोहायला गेले असता त्यांचा आंगवली येथील बावनदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुजय अनिल घोगले (२४) व अमित अनिल माईन (२२) अशी मृत युवकांची नावे आहेत. हातीव गावकरवाडी येथील हे दोन युवक मुंबईला राहत होते. लॉकडाऊन काळात ते हातीव येथे आले होते. यातील अमित हा सुजयचा आतेभाऊ आहे. ते दोघेही शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आंगवली येथील बावनदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी आपली दुचाकी कासारकोळवण येथील विठाबाई बस थांब्याजवळ उभी करून ठेवली होती. हे दोघेही आंगवली येथील घोडदे या ठिकाणी बावनदीत पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले. सायंकाळपर्यंत हे दोघेही घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. यावेळी ग्रामस्थांनी बावनदी पात्रात या दोघांचा शोध घेतला असता त्यांना त्यांच्या चपला तसेच गाडीची चावी नदीपात्राच्या किनारी खैराच्या झाडाजवळ आढळून आली. यावरून हे दोघेही नदीच्या पाण्यात बुडाले असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी काढला. यानंतर रात्रभर ग्रामस्थांची ही शोधमोहीम सुरू होती. मात्र, या मोहीमेला यश आले नाही. बुडालेल्या या दोघांचेही मृतदेह सापडल्यानंतर ते पाण्याबाहेर काढण्यात आले. यावेळी देवरूख पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेहांचे विच्छेदन करण्यासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या बाबत अनिल कृष्णा घोगले यांनी देवरूख पोलिस ठाण्यात या घटनेची खबर दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. डी. मावळणकर करीत आहेत. या दुर्घटनेने हातीव गावावर शोककळा पसरली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:53 AM 07-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here