भारतीय हवाई दलात राफेलचा समावेश होताच बिथरला पाकिस्तान; चीनकडे केली ‘ही’ मागणी

0

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांचा आज भारतीय हवाई दलात समावेश झाला आहे. यामुळे भारताचं सामर्थ्य वाढलं आहे. तर शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानची झोप उडाली आहे. BVRAAM (व्हिज्युअल रेंजच्या बाहेर) मीटियर मिसाईलसह सज्ज असलेलं राफेल आशियातलं सर्वात सामर्थ्यशाली लढाऊ विमानं मानली जातात. राफेलच्या हवाई दलातील समावेशामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. आता पाकिस्ताननं चीनकडे मदत मागितली आहे. अत्याधुनिक लढाऊ विमानं आणि क्षेपणास्त्र देण्याची मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. पाकिस्ताननं चीनकडे ३० जे-१० सीई लढाऊ विमानं आणि हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं मागितली आहेत. पाकिस्तान २०१० पासूनच जे-१० लढाऊ विमानांची मागणी करत आहे. मात्र चीन आणि पाकिस्तान जेएफ-१७ च्या उत्पादनात व्यस्त असल्यानं ही मागणी मागे पडली. मात्र आता भारतीय हवाई दलात राफेलचा समावेश झाल्यानं पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्ताननं पुन्हा एकदा चीनकडे जे-१० सीई विमानांची मागणी केली आहे. यासोबतच लघु आणि लांब पल्ल्यावर मारा करू शकणाऱ्या पीएल-१० आणि पीएल-१५ क्षेपणास्त्रांसाठीही पाकिस्ताननं चीनसोबत बातचीत सुरू केली आहे. अमेरिका आणि भारत जवळ आल्यानं आता पाकिस्तानकडे चीनकडून मदत मागण्याचा पर्याय शिल्लक आहे. जे-१० सीई चिनी हवाई दलातील जे-१० विमानाची निर्यात आवृत्ती आहे. यामध्ये एईएसए रडार, फायर कंट्रोल सिस्टमचा समावेश आहे. पाकिस्तानी हवाई दलात सध्या १२४ जेएफ-१७, ७० एफ-१६ आणि मिराज ३ ए विमानं आहेत. पाकिस्तानला चीनकडून जे-१० सीई विमानं मिळाल्यास भारतासाठी ते आव्हान ठरू शकतं.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:56 PM 10-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here