सोशल मीडियावर रंगले पाचवे ‘कानसेन’ संमेलन

0

रत्नागिरी : सोशल मीडियाद्वारे राज्यभरातील विविध प्रांतातून एकत्र आलेल्या ‘कानसेनां’नी सलग चार वर्षे येथे लाइव्ह स्नेहसंमेलन साजरे केले. मात्र यावर्षी सोशल मीडियाद्वारे संमेलन यशस्वीपणे साजरे झाले. संमेलनाला यंदा व्यापक स्वरूप मिळाले. सलग दहा दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. फेसबूकच्या माध्यमातून पार पडलेल्या या संमेलनात पाचशेहून अधिक जणांनी उपस्थिती नोंदवली. दररोज तासभराचा लाइव्ह परफॉर्मन्सही रंगला. ह. भ. प. सायली मुळ्ये हिने कीर्तन सादर केले. प्रतीक जोशी यांची शास्त्रीय गायन, अभंग, नाट्यगीतांची मैफल, प्राजक्ता पेटकर-मोरे, सई हातेकर, मानसी कुलकर्णी व मनोज क्षीरसागर यांनी मराठी गीतांचा कार्यक्रम ‘स्वरगंध’ आणि ‘एका संगीतकाराची मुशाफिरी’ हा सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांचे गीतगायन आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरला. चित्रे, रांगोळी, फोटोग्राफी, मूर्तिकला, ओरिगामी, पॉटरी, मेंदी प्रात्यक्षिक, पाककला, विविध हस्तकला यांच्या ध्वनिचित्रफिती सादर झाल्या. विनया परब यांच्या संगीत संयोजनाखाली ‘स्वराभिषेक- रत्नागिरी’ च्या शिष्यवर्गाने बहारदार गीतगायनाची मेजवानी रसिकांना दिली. ऐश्‍वर्या बेहरे (अभिवाजन), वर्षा जोशी व अर्चना देवधर (काव्य), श्रीरंग दातार (कथा), शिल्पा कुलकर्णी (नाट्यछटा) यांच्या सादरीकरणासोबत ‘कोकणचा साज..’ चे कलाकार सुनील बेंडखळे यांनी संगमेश्‍वरी भाषेतून रसिकांशी संवाद साधला. निनाद दैठणकर (संतूरवादन), शेखर दंडे व विलास हर्षे (संवादिनी) आणि सुप्रसिद्ध की-बोर्ड ब्लेअर सत्यजित प्रभू यांचे संवादिनी वादन मंत्रमुग्ध करणारे ठरले. प्रसिद्ध गझलगायक सुरेश दंडे यांच्यासह दीपमाला लोहाडे व अस्मिता काळे यांचे गायनही रसिकांना भावले. मिताली भिडे (भरतनाट्यम्), दर्शना कामेरकर, रूपाली लिमये, रूपाली फडके, अक्षता क्षीरसागर, मृणाली डांगे, मृणाल केळकर, सायली जाधव, स्वरदा महाबळ यांनी वैविध्यपूर्ण नृत्याविष्कार सादर केला. शास्त्रीय नृत्याने संमेलनाचा समारोप झाला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुनीता गाडगीळ यांनी केले

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:00 PM 19-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here