जिल्ह्यातील वादळग्रस्तांसाठी साडेचार कोटी

0

◼️ कुटुंबातील एकालाच मिळणार मदत; अनेकजण राहणार वंचित

रत्नागिरी : महा आणि क्यार वादळामुळे कोलमडलेल्या मच्छिमारांना सावरण्यासाठी राज्य सरकारने मच्छिमारांसाठी ६५ कोटीचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमधून रत्नागिरी जिल्हयाला साडेचार कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. या मदतीतून एका कुटुंबातील एकाच मच्छिमाराला मदत करण्याचा निकष असल्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी सांगितले

महा आणि क्यार या वादळामुळे गतवर्षी मच्छीमारी व्यावसाय पूर्णतः ठप्प झाला होता. त्यामधून सावरण्यासाठी राज्य सरकारकडून 65 कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून मत्स्य विभागाने प्रस्ताव मागविले आहेत. तशा सुचना मच्छीमारी सोसायटींना दिल्या होत्या. मच्छीमारी नौका, मत्स्य विक्रेत्या महिला यांना याचे लाभ दिले जाणार आहेत. या पॅकेजमधून रत्नागिरी जिल्ह्याला साडेचार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. मदत देताना शासनाकडून आलेल्या परिपत्रकातील निकष मच्छीमारांना त्रासदायक ठरत आहे. अनेक मच्छीमार महिलांकडे ग्रामपंचायतींची प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या लाभापासून वंचित राहणार आहेत. त्याचबरोबर एकाच कुटूंबातील एकाच व्यक्तीला याचा लाभ दिला जाईल हा निकष अनेकांना अडचणीचा ठरु शकतो. काही कुटूंबांमध्ये एक मासेमारी नौका असते. घरातील अन्य सदस्य मच्छी विक्रीचे काम करत असतात. यामध्ये त्या दोघांपैकी एकालाच लाभ दिला जाईल असे निकषात आहे. जिल्ह्याला प्राप्त झालेल्या साडेचार कोटी रुपयांपैकी 28 लाख रुपये मच्छीमारांच्या बँक खात्यात वितरीत केले आहेत. जसे प्रस्ताव येतील तसे त्याचे वितरण करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:02 PM 08-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here