मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जिल्ह्याला भुयारातून भेट, स्वागतासाठी सज्ज असलेल्यांची निराशा

0

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोयना जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पातील चौथ्या टप्प्यातील विद्युतगृह अलोरे (ता. चिपळूण) येथील भुयारात असून मुख्यमंत्री कोयनेतून भुयारी मार्गाने तेथेपर्यंत आले आणि पाहणी करून त्याच मार्गाने परत गेले. केवळ भुयारी मार्गाने मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्याला दिलेली ही पहिलीच भेट होती.

श्री. ठाकरे यांचा दि. १० डिसेंबरला कोयना जलविद्युत प्रकल्पाचा पाहणी दौरा होता. त्यानुसार त्यांचा रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्याचा तपशील जिल्हा माहिती कार्यालयाने दिला होता. तो असा – सकाळी १०.५० वाजता पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा ४ विद्युतगृह येथे आगमन. सकाळी १०.५० वाजता पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा ४ विद्युतगृहाची पाहणी. सकाळी ११.२० वाजता मोटारीने कोयना धरण (ता. पाटण, जि. सातारा) कडे प्रयाण. या तपशिलानुसार मुख्यमंत्री जलविद्युत केंद्राची पाहणी केल्यानंतर मोटारीने कोयना धरणाकडे रवाना होणार होते. मुख्यमंत्री येणार म्हणून गेले दोन दिवस शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. कोयना प्रकल्प ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने परवनागीशिवाय तेथे प्रवेश दिला जात नाही. कालच्या दौऱ्याच्या निमित्ताने वरिष्ठ अधिकाऱ्यांची करोनाविषयक चाचणी केली होती. निगेटिव अहवाल असलेल्यांनाच दौऱ्यात प्रवेश देण्यात आला होता. अधिकाऱ्यांसाठी विशेष पासची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी गावांच्या सीमेवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कुंभार्ली घाटातही विशेष पथक होते. एवढा बंदोबस्त झाला असल्याने मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात अलोरे येथे भेट देणार, अशी खात्री होती. कोयना प्रकल्पाच्या काही प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रकल्प सुरू झाल्यापासूनचा म्हणजे गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने त्यांना त्याबाबतचे निवेदन देण्यासाठी प्रकल्पग्रस्त सज्ज होते. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांचे पाय रत्नागिरी जिल्ह्याच्या जमिनीला लागलेच नाहीत. ते हवाई मार्गाने हेलिकॉप्टरद्वारे प्रकल्पाच्या ठिकाणी आले. भुयारी मार्गाने रत्नागिरी जिल्ह्यात अलोरे येथे जमिनीखालूनच त्यांनी प्रकल्पाला भेट दिली आणि ते आल्या पावली माघारी परतले. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्यांचीही निराशा झाली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:14 AM 11-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here