‘किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार’

0

ठाणे : विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या विहंग गार्डन येथील बी १ आणि बी २ या इमारतींना अद्याप वापर परवाना मिळालेला नाही. या इमारतींमधील ९ ते १३ मजले अनधिकृत असून ते तोडण्याचे आदेश २०१२मध्येच तत्कालीन पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषदेमध्ये केला. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारही करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. विहंग गार्डनच्या ए इमारतीसाठी वापर परवाना प्रदान करण्यात आला आहे. मात्र बी १ आणि बी २ इमारतींसाठी वापर परवाना देण्यात आला नाही. या संदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे पालिकेकडे अपील केल्यानंतर काही अटींवर अनधिकृत बांधकाम तोडण्याचे काम तात्पुरते थांबवण्यात आले. पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी एक महिन्याची मुदत दिली होती. त्याला आठ वर्षे झाल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. विहंग गार्डनच्या बी१, बी२ या तेरा मजली इमारतींतील घरांची विक्री करून प्रामाणिक मध्यमवर्गीय ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सरनाईक यांच्या या फसवणुकीला ठाणे पालिकेने संरक्षण दिले आहे. त्यामुळे विहंग ग्रुप ऑफ बिल्डरच्या विरोधात ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. याबाबत सोमय्या यांनी ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते संजय वाघुले यांच्यासोबत मंगळवारी पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची भेटही घेतली. या अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई का नाही केली, असा जाब विचारल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

दरम्यान, प्रताप सरनाईक विहंग गार्डनमधील इमारती अधिकृत असून त्यातील एकही मजला अनधिकृत नाही. संपूर्णपणे कायद्याच्या कक्षेमध्ये आणि नियमांच्या आधारे असून वेळोवेळी पालिकेने सर्व इमारतींना परवानगी दिली आहे. तीन मजले अनधिकृत असल्याची नोटीस काढल्यानंतर पालिकेची लोकमान्यनगर मधील शाळा बांधून दिल्याच्या टीडीआरच्या मोबदल्यामध्ये मिळालेला एफएसआय वापरून, दंड आकारून सदरच्या मजल्यांनाही पालिकेने रीतसर परवानगी दिली आहे. मात्र, दंडाची रक्कम जास्त असल्याने ती कमी व्हावी यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार सुरू आहे. ओसीच्या कामाला विलंब होत असला तरी या प्रकल्पामध्ये एफएसआयचे उल्लंघन झालेले नाही. सर्व बांधकाम अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र महानगरपालिकेने दिले असल्याने अनधिकृत बांधकामाचा प्रश्नच उद्भवत नाही. दहा वर्षांपूर्वीचे प्रकरण बाहेर काढून बदनामीचा प्रयत्न करणारे किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सरनाईक म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:30 AM 17-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here