भारत वि. ऑस्ट्रेलिया : टीम इंडियावर नामुष्की, 36 रन्समध्ये गारद

0

पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियावर सार्वकालीन नीचांकी स्कोअरवर गारद होण्याची नामुष्की ओढवली. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्या भेदक बॉलिंगसमोर टीम इंडियाच्या बॅट्समननी शरणागती पत्करली. याआधी टेस्ट क्रिकेटमध्ये भारताची नीचांकी धावसंख्या 42 होती. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाची स्थिती 9/1 अशी होती. भारतीय संघाकडे समाधानकारक लीड होतं. मात्र तिसऱ्या दिवशी हेझलवूड आणि कमिन्ससमोर भारतीय बॅट्समन निरुत्तर झाले. टीम इंडियाच्या एकाही बॅट्समनला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भरवशाच्या चेतेश्वर पुजाराला भोपळाही फोडता आली नाही. कर्णधार विराट कोहली चार रन्स करून माघारी परतला. टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेही भोपळाही फोडू शकला नाही. पॅट कमिन्सचा बॉल हातावर बसल्याने मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 रन्सचं लक्ष्य मिळालं आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंग घेत 244 रन्सची मजल मारली होती. कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 74 रन्सची खेळी केली होती. चेतेश्वर पुजाराने 43 तर अजिंक्य रहाणेने 42 रन्स केल्या होत्या. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली खेळत असताना टीम इंडिया सुस्थितीत होती. मात्र चोरटी रन घेण्याचा प्रयत्न अंगलट आणि कोहली बाद झाला. मिचेल स्टार्कने 4 विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना, घरच्या मैदानावर खेळत असूनही ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली. रवीचंद्रन अश्विन आणि अन्य बॉलर्सच्या दमदार कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा डाव 191 रन्समध्येच गुंडाळला. कर्णधार टीम पेनने नाबाद 73 रन्सची खेळी केली. टीम इंडियाकडून अश्विनने 4 तर उमेश यादवने 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाला 53 रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवसअखेर खेळताना टीम इंडियाने पृथ्वी शॉला गमावलं होतं. तिसऱ्या दिवशी आघाडी बळकट करणं अपेक्षित असताना टीम इंडियाच्या बॅट्समननी सपशेल नांगी टाकली. जोश हेझलवूडने 5 ओव्हर्समध्ये अवघ्या 8 रन्सच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्सने 21 रन्सच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने 6 ओव्हर्समध्ये 3 मेडनसह फक्त 7 रन्स दिल्या. टीम इंडियाची याआधीची नीचांकी धावसंख्या 42 होती. 1974 साली इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स इथं खेळताना टीम इंडियावर ही नामुष्की ओढवली होती. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका तर टीम इंडियाने ट्वेन्टी-20 मालिका जिंकली होती. प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेतील पहिली कसोटी पिंक बॉल कसोटी होती. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सात पिंक बॉल टेस्ट खेळल्या असून, सातही कसोटीत विजय मिळवत त्यांनी दणदणीत वर्चस्व गाजवलं आहे. टीम इंडियाने आघाडी मिळवत चांगली वाटचाल केली होती. मात्र तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भेदक गोलंदाजीचा वस्तुपाठ सादर करत टीम इंडियाला अर्धशतकही करू दिलं नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:41 AM 19-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here