दापोलीत मोठ्या प्रमाणात मासळीला उठाव

0

दापोली : दापोलीतील समुद्र किनारी भागात मोठया संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने मासळीला चांगलाच उठाव होत आहे. मासळीला किंमतही चांगली मिळत असल्याने मासळी व्यवसायिकांची वर्षअखेर तेजीत जाणार आहे.

25 डिसेंबरच्या नाताळ सणाच्या सुट्टीपासून पुढे सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या इंग्रजी वर्षाच्या स्वागताला दरवर्शी प्रमाणेच याही वर्षी दापोलीतील समुद्रकिनाऱ्यांलगतची रिसॉर्टआजपासूनच हाऊसफुल्ल झाली आहेत. नाताळ सणापासूनच दापोलीत दाखल झालेल्या पर्यटकांमुळे मासळीचा उठाव चांगला होत असून मासळीला किंमतही चांगलीच मिळत आहे. त्यामुळे मागील काही महीने आर्थिक टंचाईत गेलेल्या मासळी व्यावसायीकांचे आजपासूनच आर्थिक प्राप्तीचे दिवस सुरू झाले आहेत. दापोली तालुक्यातील मासळीमारीसाठी दाभोळ, कोळथरे, बुरोंडी, हर्णे, पाजपंढरी, आडे, उटंबर आणि केळशी ही गावे प्रसिध्द असली तरी मासळीचा खरा व्यवसाय हा हर्णे बंदरातच चालतो. या हर्णे बंदरात सकाळ संध्याकाळ दोन वेळा मासळी लिलाव प्रक्रिया चालते. त्यामुळे तालुक्यासह जिल्हाभरातून मासळी खरेदी करण्यासाठी हर्णे बंदरावर दररोज खरेदीदार व्यापाऱ्यांसह खवय्ये हे येत असतात. सध्या दापोलीत समुद्र काठच्या गावांसह तालुक्यात तसेच लगतच्या मंडणगड तालुक्यात मोठया प्रमाणात हॉटेल व्यावसायासह घरगुती खानावळी तसेच निवासी व न्याहारी योजना सुरू आहेत. हे व्यावसायीक मासळी खरेदी साठी हर्णे बंदरालाच प्राधान्य देतात. त्यामुळे हर्णे बंदरात तसा कायमच मासळीचा उठाव होत असला तरी अधिक पैसे मिळण्यासाठी मासळी विक्रेत्यांना दापोली ,मंडणगड आणि खेड तालुक्यातील गावागावात जावून मासळी व्यावसाय करावा लागतो. मात्र सध्या समुद्रातून मारून आणलेल्या मासळीला जागेवरच उठाव होत असून अपेक्षेपेक्षा अधिक पैसे मिळत आहेत. जागेवरच होणाऱ्या विक्रीच्या उठावाने मासळी विक्रेत्यांचा बर्फ आणि वाहनाचा खर्च वाचत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:19 AM 26-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here