राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा चिपळूणमधील ७५४ शेतकऱ्यांना लाभ

0

चिपळूण : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून चालू आर्थिक वर्षात चिपळूण तालुका कृषी कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या फळ लागवडीचा ७५४ शेतकऱ्यांना लाभ झाला. पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून राबविलेल्या या योजनेतून लाभार्थींनी ४८.८५ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली. शासनाकडून दरवर्षी पावसाळ्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेतून फळबाग लागवड केली जाते. तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार करून परिपूर्ण प्रस्ताव असणाऱ्या शेतकऱ्यांची निवड योजनेसाठी केली जाते. त्यांना तीन वर्षांत अनुदानाची रक्कम दिली जाते. लागवड केल्यापासून रोपांची देखभाल करणे, शेताला कुंपण आणि लावलेल्या रोपांची जोपासना करून रोपे जगविली गेली, तर पूर्ण रक्कम दिली जाते. त्यात आंबा लागवडीला एक लाख ६४ हजार २८७, नारळ लागवडीसाठी एक लाख ३७ हजार ५१९, तर सागाच्या लागवडीसाठी एक लाख १२ हजार ५२७ रुपयांचे अनुदान दिले जाते. चिपळूण तालुक्यात यावर्षी कृषी कार्यालयाकडे ८१६ शेतकऱ्यांचे प्रस्ताव आले. त्यापैकी ७५४ प्रस्ताव मंजूर झाले. त्यासाठी ३७९.२६ हेक्टरची मर्यादा होती. या योजनेतून आंबा, काजू, नारळ, चिकू, जांभूळ, फणस, कोकम, बांबू आणि शेवगा या झाडांची लागवड केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर फळलागवड करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागात शेती करताना शेतकऱ्यांना फळबाग लागवडीतून उत्पन्न मिळावे, शेतीतून आर्थिक उत्पन्न घेताना शेतकऱ्याची वाटचाल समृद्धीकडे व्हावी, यासाठी ग्रामरोजगार सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:43 PM 30-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here