गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्पर्धेत वैभववाडीचे हर्ष नकाशे प्रथम

0

◼️ ‘स्वराभिषेक’चे आयोजन; सई जोशी, नितीन धामापूरकरचे यश

रत्नागिरी : येथील गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई ऑनलाईन अभंग गायन स्पर्धेत वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील हर्ष नकाशे यांनी विजेतेपद पटकावले. तब्बल 200 स्पर्धकांमधून त्यांनी हे यश संपादन केले. बदलापूर येथील सई जोशी आणि कुडाळ येथील नितीन धामापूरकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. ‘स्वराभिषेक-रत्नागिरी’ने प.पू. गगनगिरी महाराज भक्त मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन संतरचित अभंग गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेकरिता खल्वायन रत्नागिरी संस्थेचे प्रायोजकत्व लाभले. स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, नाशिक, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी विभागांमधून 6 ते 85 वर्षाच्या स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याशिवाय परदेशातील स्पर्धकही यंदा सहभागी झाले. अटलांटा आणि कॅलिफोर्नियातून व्हिडिओ दाखल झाले होते. गोवा येथील दिगंबर गाड यांनी परीक्षण केले. अ‍ॅड. राजशेखर मलुष्टे यांनी सोशल मीडियाद्वारे निकाल जाहीर केला. स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : प्रथम- हर्ष नकाशे, द्वितीय- सई जोशी, तृतीय- नितीन धामापूरकर, उत्तेजनार्थ- सृष्टी तांबे (सावर्डे, ता. चिपळूण), प्रसाद शिंदे (पोमेंडी खुर्द, रत्नागिरी), सोशल मीडियाद्वारे मिळालेल्या सर्वाधिक लाईक्सची विजेती- पूर्वा नागवेकर (रत्नागिरी). स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प.पू. गगनगिरी महाराज आश्रमाचे राम पानगले, स्वराभिषेकच्या संचालिका सौ. विनया परब, त्यांचा शिष्यवर्ग आणि ‘टीम स्वराभिषेक’च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रतिसाद ग्राफिक्सचे सचिन सिधये यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:58 AM 31-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here