‘चिंतातुर जंतूप्रमाणे भाजपनं उगाच वळवळ करू नये’, औरंगाबादच्या मुद्यावरुन शिवसेनेचं टीकास्त्र

0

मुंबई : औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरुन सध्या राजकारण तापलं आहे. काँग्रेसनं औरंगाबादच्या नामांतराला विरोध केल्यानंतर भाजपनं शिवसेनेला सवाल केले आहेत. यावरुन आता शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावे, अला टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपाला लगावला आहे

सामनाच्या अग्रलेखातून नामांतराच्या मुद्द्यावर भूमिका मांडत म्हटलं आहे की, औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे. सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करून टाकले व जनतेने ते स्वीकारले. त्यामुळे आता संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल, असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत. निदान या विषयावरून सरकारात ठिणगी तरी पडेल, असे काही लोकांना वाटत आहे, असं सामनात म्हटलं आहे.

शिवसेनेनं म्हटलं आहे की, बाळासाहेब थोरात म्हणतात ते बरोबरच आहे. महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहेच. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱ्यांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील व औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तिथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावे!,’ असं टोला शिवसेनेनं लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, ‘अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रस्ता असे नामांतर होऊ शकते, तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही?’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. त्यांच्या या तल्लख बुद्धीचातुर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. भारतीय जनता पक्षाचा जो ज्ञानरथ अलीकडच्या काळात उधळला आहे त्या रथाचे पुढचे चाक म्हणजे चंद्रकांत पाटील असाच समज यामुळे मराठी जनतेचा होईल, पण पाटलांच्या या बिनतोड सवालास पूरक म्हणून आम्ही त्यांना एक मुंहतोड जवाब विचारू इच्छितो की, अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या केले, दिल्लीच्या औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम केले त्याच वेळी महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत? ते जरा जनतेला सांगून टाका! महाराष्ट्रात फडणविसांचे व दिल्लीत मोदींचे सरकार होते व इतर नामांतरांबरोबर छत्रपती संभाजी राजांनाही औरंगजेबाच्या छाताडावर बसवता आले असते. मग सहज शक्य असताना तुम्ही फक्त संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत? व आता मात्र शिवसेनेस उलटा प्रश्न विचारीत आहात,’ असा सवाल शिवसेनेनं भाजपला केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:30 AM 02-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here