स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवात बालकलाकारांचा ‘स्वराभिषेक’

0

पावस : साक्षात स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगांचेच ‘स्वराभिषेक’च्या बालकलाकरांनी केलेले बहारदार गायन यामुळे स्वामींच्या जन्मोत्सवात साक्षात स्वरांचा अभिषेक श्रोत्यांनी अनुभवला. कार्यक्रमातील दोन अभंगांना यातीलच कलाकारांनी संगीतबद्ध केले होते, हे विशेष. स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवाचे सर्व कार्यक्रम यावर्षी भाविकांना ऑनलाईन पद्धतीने अनुभवावे लागले. कोरोनाच्या सावटामुळे राज्यातील विविध भागातून येणार्‍या दिंडी यावर्षी येऊ शकल्या नाहीत. दर्शनासाठी येणार्‍यांवरही मर्यादा होती. त्यामुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना मर्यादित उपस्थिती होती. हे सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने प्रसारित झाले. रविवारी स्वामींच्या जन्मोत्सवातील मुख्य दिवशी ‘स्वराभिषेक-रत्नागिरी’ संस्थेच्या शिष्यवर्गाने सादर केलेल्या स्वामी स्वरूपानंद रचित अभंग गायनाचा रसिकांना मंत्रमुग्ध केले. सौ. विनया परब यांच्या संगीत संयोजनाखाली त्यांचे शिष्य सिद्धी शिंदे, चैतन्य परब, तन्वी मोरे, आदित्य पंडित, आदित्य दामले यांनी सुमधूर गायकीने वातावरण भक्तिमय केले. जय जय रामकृष्ण हरी या गजराने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर चैतन्यने स्वतः संगीतबद्ध केलेला कृपावंत थोर हा अभंग सादर केला. सगुण निर्गुण, देवा तू सागर, शरण जाता रमावरा, हरी रूप ध्यावू, अंतर्बाह्य राम झालो ही स्वामी स्वरूपानंदांची अनेक पदे बहारदारपणे सादर केली. ॐ राम कृष्ण हरी या स्वामींच्या गजराने कार्यक्रमाची सांगता झाली. साक्षी जांभेकरने आपल्या निवेदनातून स्वामींचे विचार नेमकेपणाने रसिकांसमोर मांडले. कार्यक्रमाला महेश दामले (संवादिनी), मंगेश मोरे (की-बोर्ड), मंदार जोशी (बासरी), केदार लिंगायत (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज) आणि अद्वैत मोरे (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली. एसकुमार साऊंडचे उदयराज सावंत यांनी उत्तम ध्वनिसंयोजन केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:19 AM 12-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here