ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी हनुमानाचे छायाचित्र ट्विट करत मानले मोदींचे आभार

0

नवी दिल्ली : संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. त्याचबरोबर जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. भारतातही दोन कोरोना प्रतिबंधक लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून, त्या लसींचे सध्या लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर मदतीसाठी ब्राझीलने हात पुढे केला होता. ब्राझीलला लस पुरवठा करण्यास भारतानेही परवानगी दिल्यानंतर राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचे छायाचित्र ट्विट करत भारताचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना भारताने आपातकालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर लसीची मागणी ब्राझीलने केली होती. तसे पत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांनी पाठवले होते. भारताने देखील ब्राझीलकडून करण्यात आलेल्या मदतीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लस पुरवण्यास सुरूवात केली. भारताकडून लसींचे डोस पाठवण्यात आल्यानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्विट करत आभार मानले. ब्राझीलला जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल अभिमान वाटत असून ब्राझीलला भारतातून लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल आभार, अशा आशयाचे एक ट्विट बोलसोनारो यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बोलसोनरो यांच्या ट्विटला प्रतिसाद दिला आहे. बोलसोनारोजी, कोरोना या महामारीविरोधात एकजुटीने लढण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणे हा आमचा एकप्रकारे सन्मान आहे. आपले आरोग्यसेवांवरील सहकार्य भारत बळकट करत राहिल, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:59 PM 23-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here