कोयनेचे पाणी कोकणालाच देण्याचा नियोजन समितीचा ठराव

0

रत्नागिरी : कोयना प्रकल्पाचे साठ एमएलडी अवजल समुद्राला मिळते. ते कोकणालाच मिळावे, असा ठराव रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बुधवारच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोयनेचे अवजल वीज निर्मिती झाल्यानंतरचे असल्यामुळे त्याची पूर्ण तपासणी करून ते पिण्यासाठी द्यावे अथवा जलसिंचन प्रकल्पाद्वारे शेतीसाठी ते वापरण्यात यावे, त्यातील काही भाग औद्योगिक वसाहतींना दिला जावा आणि एमआयडीसीचे सध्याचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी द्यावे, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल आणि प्रस्ताव तयार करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे.

पाणीटंचाईचा सुमारे दहा कोटीचा कृती आराखडाही तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यास आदेश देण्यात आले आहेत, असे श्री. परब म्हणाले. घरोघरी प्रत्येकाला पाणी देण्याच्या केंद्र शासनाच्या योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यासाठी आराखडा तयार करून त्याची मंजुरी घ्यावी आणि कामाला सुरुवात करावी, अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
परशुराम (ता. चिपळूण) गावातील जमिनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादित करावयाच्या होत्या. मात्र ती कार्यवाही अद्याप होऊ शकलेली नाही. परशुराम देवस्थान आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यातील वादामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या जमिनीपोटी परशुराम देवस्थानाला ठरावीक दस्त द्यावयाचा आहे. त्या बदल्यात जमिनी ग्रामस्थांच्या मालकीच्या राहणार आहेत. परशुराम देवस्थानच्या म्हणण्यानुसार मात्र या जमिनी देवस्थानाच्या आहेत. मालकीच्या या प्रश्नावरून उद्भवलेला वाद मिटविण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी आज पालकमंत्र्यांची भेट घेतली. मात्र हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे आपण त्याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नसल्याचे श्री. परब यांनी स्पष्ट केले न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट पाहावी, अशी सूचना ग्रामस्थांना केल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार परशुराम देवस्थान एप्रिल १९७२ पर्यंत प्रशासकांच्या ताब्यात होते. त्यानंतर परशुराम देवस्थानाची जमीन असा फेरफार करण्यात आला. त्याला तहसीलदारांनी मान्यता दिली. त्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणि नंतर कोकण आयुक्तांकडे सोपविण्यात आले. कोकण आयुक्तांनी त्याबाबतचा निर्णय अद्यापही दिलेला नाही. दिला असल्यास त्याची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध झालेली नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेतसुद्धा शासनाने याबाबतची आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ती करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांकडे केली. मात्र याबाबतची शासनाची भूमिका न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल झालेली आहे. त्याची प्रत शिष्टमंडळाला द्यावी, अशी सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांिना केली. या प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर लागावा, यासाठी शासकीय स्तरावर आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.दरम्यान, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोयनेच्या पाण्याचा वापर कोकणासाठी करण्याच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या प्रस्तावाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. या ठरावाची अंमलबजावणी होण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती मदत आपण करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी ही माहिती दिली

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:39 PM 28-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here