जिल्ह्यातील 280 उद्योजकांकडे 16 कोटी 29 लाखांची थकबाकी, महावितरणने बजावली नोटीस

0

रत्नागिरी : महावितरण कंपनीने जिल्ह्यातील 93 मोठ्या आणि 187 छोट्या उद्योजकांना दणका दिला आहे. 280 उद्योजकांकडून सुमारे 16 कोटी 29 लाख थकबाकी असून ती लवकरात लवकर भरावी, अन्यथा वीज जोडणी तोडण्याचे नोटीस बजावली आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने कठोर पावले उचलली आहेत.

कोरोना महामारीने महावितरण कंपनीलाही अडचणीत आणले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व ठप्प झाले होते. अनलॉकनंतर महावितरण कंपनीने सलग तीन महिन्याची ग्राहकांना बिल दिली. मात्र बिलांचा आकडा पाहून अनेक ग्राहक चक्रावले. वाढीव बिलाचा विषय त्यानंतर सुरू झाला ते अजूनही गाजत आहे. विरोधी पक्षांनी देखील याबाबत आवाज उठवला आणि बिलं न भरण्याचा अनेक ग्राहकांनी निर्धार केला. वसुलीवर याचा मोठा परिणाम होऊन महावितरण समोर थकबाकीचा डांगर उभा राहिला. आर्थिक संकटात महावितरण आल्यामुळे काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणची थकीत बिलं भरा, असे आवाहन केले. कठीण परिस्थितीतून उभारण्यासाठी महावितरण कंपनीनेही कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. मोठ्या थकबाकीदारांना नुकतीच नोटीस बजावली आहे. जिल्ह्यातील 93 मोठ्या उद्योजकांची 12 कोटी 89 लाख थकबाकी आहे. तर 187 छोट्या उद्योजकांची 3 कोटी 40 लाख थकबाकी आहे. एकूण 280 उद्योजकांची 16 कोटी 29 लाख थकबाकी आहे. या ग्राहकांना वीज बिल भरण्याबाबत महावितरण कंपनीने नोटीस बजावली आहे. बिल भरा अन्यथा जोडणी तोडण्याचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 04-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here