सहा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास ५ वर्षे सश्रम कारावास

0

रत्नागिरी : सहा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एकाला ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा पोस्को शीघ्रगती न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश श्रीमती व्ही.ए. राऊत यांनी सुनावली. ही घटना २०१९ मध्ये घडली होती.

जून २०१९ मध्ये यातील पीडित बालक आपल्या कुटुंबासोबत रत्नागिरी येथे रहायला आला होता. ज्या ठिकाणी पीडित बालक राहत होता त्याच इमारतीत संशयित आरोपी भावेश अमृतलाल वरू (वय ४४) हा राहिला होता. त्याचा फायदा घेत भावेश याने ६ वर्षाच्या बालकावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर हा प्रकार एका शिक्षिकेने पाहिल्यानंतर सारा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी त्या शिक्षकेने त्या पीडित मुलाला विचारणा केली आणि त्या मुलानेदेखील घडला प्रकार या शिक्षिकेला सांगितला. या प्रकारानंतर शाळेतील सर्व शिक्षक चांगलेच हादरले होते. वर्गशिक्षिकेने त्याबाबतची माहिती मुख्याध्यापकांना दिली आणि नंतर चाईल्डलाईन मार्फत मुलाच्या पालकांना त्याबाबतची माहिती देण्यात आली. हा प्रकार धक्कादायक होता. मुलाच्या पालकांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार केली. पोलिसांनी भावेश अमृतलाल वरू (वय ४४) याच्याविरूद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७, ८, ९, १०,११, १२ अन्वये गुन्हा दाखल केला होता.हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच सोमवारी त्यावर सुनावणी झाली. या खटल्यात भावेश वरू याला दोषी ठरवून पोस्को न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश श्रीमती व्हि.ए. राऊत यांनी वरू याला ५ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात एकूण ८ साथीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत ही शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अनिरूद्ध फणसेकर व सहाय्यक सरकारी वकील सौ. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. या खटल्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दिपीका मुसळे यांनी केला होता तर पैरवी अधिकारी म्हणून रोहन दणाणे व मपोहवा एस.बी. शिंदे व मपोकॉ. माने यांनी काम पाहिले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 09-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here