उपकेंद्रांसाठी आणखीन 79 समुदाय अधिकाऱ्यांची नियुक्ती

0

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक उपकेंद्रात रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यातील 380 पैकी 114 उपकेंद्रात समुदाय अधिकारी नेमले आहेत. त्याअंतर्गत आणखीन 79 जणांची नियुक्ती झाली असून ते सहा महिन्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रत्यक्ष उपकेंद्रांवर कार्यरत होणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

आरोग्य विभागाच्या योजना प्रत्यक्षात राबविणे, गावात साथ पसरल्यास किंवा नियमित आजारांवर उपचार करण्यासाठी उपकेंद्रांची निर्मिती केली आहे; मात्र तिथे परिचर आणि आरोग्य कर्मचारी नियुक्ती केले आहेत. प्रत्यक्ष उपचारासाठी रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यावे लागते. याचाच विचार करुन आरोग्यवर्धिनी उपक्रमांतर्गत उपकेंद्र सक्षमीकरणाचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात निवडलेल्या 114 जणांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये बीएएमएस, युनानी, बीएस्सी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात उपचार यंत्रणा राबविणे उपकेंद्रात शक्य होणार आहे. पहिल्या टप्प्यात 114 समुदाय अधिकार्‍यांच्या नियुक्त्या झाल्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आहे. उर्वरित केंद्रातही या नियुक्ती होणार असून राज्यस्तरावरुन ही प्रक्रिया राबविली जात आहे. दुसर्‍या टप्प्यात 79 जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी राज्यात चार केंद्रे निश्‍चित केली आहेत. त्यात रत्नागिरी जिल्हा रुग्णालय, इचलकरंजी, गडहिग्लज आणि डी. वाय. पाटील हॉस्पीटलचा समावेश आहे. तिथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तत्काळ उपकेंद्राच्या ठिकाणी ते उमेदवार कार्यरत होतील, असे डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:32 PM 16-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here