लांजात गोवा बनावटीचा मद्यसाठा हस्तगत; २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

0

रत्नागिरी : गोवा राज्यातील मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला लांजा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत मद्याचे २९५ बाॅक्स व मोबाईल असा २८,७०,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दीपक गजानन जोशी (रा. कुणकेरी गावडेवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला ताब्यात घेण्यात आले आहे. लांजा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला महामार्गावर मद्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर कंपनीचा चॉकलेटी रंगाचा टेम्पो क्रमांक एमएच.०७.सी.६५७९ थांबवून तपासणी करण्यात आली. या तपासणीत टेम्पोच्या मागील भागात विविध कंपन्यांच्या मद्याचे एकूण २९५ बाॅक्स जप्त करण्यात आले, तसेच दीपक जोशी याच्याकडील मोबाइलही जप्त करण्यात आला. त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ, ई, ८१,८३,९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपीला मे. न्यायालय लांजा रत्नागिरी येथे रिमांड कामी हजर करण्यात आले. सदरची कारवाई कोल्हापूर विभागाचे विभागीय आयुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक बी. एच. तडवी, उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व्ही. एस. मोरे यांनी केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक अमित पाडाळकर, सुधीर भागवत, संदीप विटेकर, वाहनचालक मिलिंद माळी, जवान ओमकार कांबळे यांनी सहभाग घेतला होता.सदर गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक, श्री. व्ही. एस. मोरे हे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 20-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here