पबवर कारवाई केली म्हणून निलंबन, पोलीस निरीक्षकाचे परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप

0

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. परमबीर सिंह यांच्या आरोपामुळे अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री पदावर टांगती तलवार आहे. एकीकडे परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप लावला तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर पैसे मगितल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे परमबीर सिहं यांची आणखी अडचण होण्याची शक्यता आहे.

गावदेवी पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार केल्याचं पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रात अनुप डांगे यांनी माजी पोलीस आयुक्त यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका पबवर कारवाई केली म्हणून आयुक्तांनी आपल्या विरोधात कारवाई केल्याचा आरोप अनुप डांगे यांनी केला आहे. अनुप डांगे यांनी 2 फेब्रुवारी रोजी याबाबतची लेखी तक्रार अपर मुख्य गृहसचिवांकडे केली आहे. त्यात केलेल्या आरोपांनुसार, गावदेवी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या डर्टी बन्स सोबो या पबवर 22 नोव्हेंबर 2019 रोजी कारवाई केली होती. पबचा मालक जीतू नावलानी याने तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असलेल्या परमबीर यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत, असे सांगून कारवाईस विरोध केला होता. त्यानंतर एसीबीच्या कार्यालयातून परमबीर सिंह यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा फोन आला होता. पण तेव्हा डांगे भेटायला गेले नाही. पण त्यानंतर परमबीर सिंह मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर अनुप डांगे यांची विभागीय चौकशी सुरू झाली आणि 4 जुलै 2020 रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात त्यांची बदली झाली आणि नंतर 18 जुलै रोजी डांगे यांचं निलंबन झाल्याचं पत्रात म्हटलं आहे. या दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबवण्यासाठी 50 लाखांची मागणी केली होती. पुढे निलंबन रद्द करून पुन्हा कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे 2 कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप ही अनुप डांगे यांनी केला आहे. तसेच परमबीर सिंह यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचंही पत्रात नमूद केले आहे. एकूणच एकीकडे परमबीर सिंह हे गृहमंत्र्यांवर आरोप करत असताना मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक यांनी देखील परमबीर सिंहांवर गंभीर आरोप केले आहेत. या दोन पत्रांमुळे मुंबई पोलीस दल ढवळून निघाले आहे हे नक्कीच. मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला धक्का लागला असं हे चित्र आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:08 PM 22-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here