महाराष्ट्रात एका आठवड्यात 4 लाख रुग्ण; टास्क फोर्सने दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक रविवारी संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडीसीव्हीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्यांवर विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत आरोग्य विभागाचे सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले की, 4 एप्रिल ते 10 एप्रिल असे एका आठवड्यात 4 लाख नवीन रुग्ण राज्यात समोर आले आहेत. तर 1982 मृत्यू झाले. सध्या मृत्यू दर 0.5 टक्के इतका असून तो वाढतोय, असंही त्यांनी सांगितलं.

टास्क फोर्सने दिल्या सूचना
या बैठकीत टास्क फोर्सने काही सूचना केल्या. 95 टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते त्यादृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी, मुंबई पालीकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला 6 मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत, तरुण रुग्णांना देखील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे, ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे यासाठी डॉक्टर्सना सुचना देणे, मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणेएमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्याचा, आयुष डॉक्टर्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेणे आदि सुचना करण्यात आल्या.

रेमडीसीव्हीरचा अवाजवी वापर थांबवण्यावर चर्चा
आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी यावरही चर्चा झाली. रेमडीसीव्हीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ टोपे यांनी देखील बोलताना अ[पण रेमडीसीव्हीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ते ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे, रेमडीसीव्हीरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे यावर कार्यवाही झाली आहे अशी माहिती दिली.

ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न
प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की, सध्या १२०० मेट्रिक टन पैकी ९८० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून पुढच्या काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होईल. केंद्र सरकारच्या समन्वयाने इतर राज्यांशी बोलून तसेच देशपातळीवरील वाहतूकदरांशी चर्चा करून ऑक्सिजन वाहतूक कशी करता येईल त्याचे प्रयत्न सुरु आहेत असेही ते म्हणाले
सध्या पॉझिटीव्हिटी दर 26 टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करतो आहोत तितका हा दर वाढतो आहे. काल रोजी आपण २ लाख ६० हजार चाचण्या केल्या. यात १ लाख एन्टीजेन चाचण्या होत्या. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्स पैकी ७५ टक्के भरले असून ६७ हजार ऑक्सिजन बेड्स पैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यात बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. नंदुरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था केली आहे असेही ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:16 AM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here