कोकणातील दहावीचे ३२,१३९ विद्यार्थी परीक्षा न देता पास

0

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे शासनाने दहावीच्या परीक्षाच रद्द केल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी सायंकाळी घोषणा केली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील २१,७८७ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०,३५२ विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली असून, सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले आहेत.

कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सीबीएसई बोर्डाने गेल्याच आठवड्यात निर्णय घेत परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पालक, विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळांतर्गत कोकण बोर्डातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५६० पुनर्परीक्षार्थी व ३१,५७९ नियमित परीक्षार्थींना परीक्षा रद्दच्या निर्णयाचा फायदा झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून ४०९ पुनर्परीक्षार्थी व २१,३७८ नियमित तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १५१ पुनर्परीक्षार्थी व १०,२०१ नियमित विद्यार्थी परीक्षा देणार होते. परीक्षा रद्दच्या निर्णयामुळे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे अभ्यासात सर्वसाधारण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयाचा फायदा झाला आहे; मात्र अभ्यासात हुशार व वर्षभर कष्ट घेतलेल्या मुलांचे कष्ट वाया गेले आहेत. बोर्डाच्या परीक्षेतील गुणवत्ता हा प्रत्येक विद्यार्थी, पालकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषय आहे; मात्र परीक्षा रद्द झाल्याने काही पालक, विद्यार्थी मात्र नाराज झाले आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षा मात्र ऑफलाइन होणार असल्याचे घोषित केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ४०९ पुनर्परीक्षार्थी व १७,६७६ नियमित, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६३ पुनर्परीक्षार्थी व ९,६९४ नियमित मिळून एकूण ५७२ पुनर्परीक्षार्थी व २७,३७० नियमित विद्यार्थ्याच्या बारावीच्या परीक्षा होणार आहेत.
दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी अकरावी प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. बहुधा अकरावी परीक्षेसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे; मात्र त्याबाबत योग्य त्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून प्राप्त होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:10 PM 21-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here