‘फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात; भाजप डबल गेम खेळतोय’

0

मुंबई : ‘भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरक्षण कायद्याच्या विरोधात आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी भाजप दोन्ही बाजूनं खेळ करतोय,’ असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नवाब मलिक बोलत होते. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं ही राज्य सरकारची भूमिका आहे. मात्र, भाजपचे देवेंद्र फडणवीस सपशेल खोटं बोलत आहेत. ते या मुद्द्यावर राजकारण आणि दिशाभूल करत आहेत. आपल्या पैशानं कोर्टात वकील पाठवत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणातही माजी पोलीस आयुक्तांना दिलेला वकील भाजपशी संबंधित आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधातील न्यायालयीन लढाईला देवेंद्र फडणवीस यांची फूस होती,’ असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. ‘आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही असे देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत होते. आज जे वकील कोर्टात लढत आहेत त्याला भाजपचं पाठबळ आहे आणि महाराष्ट्र अशांत करण्याचं कामही भाजप करत आहे,’ असंही नवाब मलिक म्हणाले. ‘मराठा आरक्षणासंदर्भातील कायदेशीर लढा राज्य सरकार नक्कीच लढणार आहे. आता पुढील जबाबदारी केंद्र सरकारकडं आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे आम्ही राज्य सरकारच्या वतीनं शिफारस करू. अद्याप राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली नाही. आयोग अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्याकडे आमची भूमिका मांडू,’ असं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:00 PM 05-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here