अमेरिका-रशिया शिखर परिषद: ‘या’ मुद्यावर बायडन-पुतीन यांचे एकमत

0

जिनिव्हा : अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध ताणले असतानाच दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी नव्या पर्वाला सुरुवात केली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी शिखर परिषदेअंतर्गत एकमेकांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत बायडन यांनी मानवाधिकाराच्या मुद्यावरून पुतीन यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तर पुतीन यांनीही आपली भूमिका कायम ठेवली. जवळपास ६५ मिनिटे झालेल्या या ऐतिहासिक बैठकीत काही मुद्यांवर सहमती झाली.

दोन्ही देशांमध्ये राजदूत

पुतीन यांनी माध्यमांना सांगितले की, अमेरिका आणि रशिया लवकरच आपल्या राजदूतांची नियुक्ती करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्यानंतर दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यात आली. रशियाने तीन महिन्यापूर्वीच अमेरिकेतील राजदूत एनातोली एंटोनोव यांना वॉशिंग्टनमधून माघारी बोलवले होते. त्यावेळी बायडन यांनी पुतीन यांना खूनी म्हटले होते. तर, अमेरिकेचे राजदूत जॉन सुलिवन यांनीदेखील दोन महिन्यांपूर्वी मॉस्को सोडले होते.
चर्चेच्या पहिल्या सत्रासाठी एकत्र आल्यानंतर बायडेन आणि पुतिन यांनी हस्तांदोलन केले. ही दोन महाशक्तींमधील चर्चा असून, प्रत्यक्ष भेटणे केव्हाही चांगलेच असते, असे बायडेन या चर्चेबाबत बोलताना म्हणाले, तर या चर्चेतून सकारात्मक निष्कर्ष निघेल, अशी आशा पुतिन यांनी व्यक्त केली. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव, अनुवादक व काही अधिकारी उपस्थित होते.

मानवाधिकाराचा मुद्दा

बायडन यांनी या बैठकीत मानवाधिकाराच्या मुद्यावर जोर दिला. दोन अमेरिकन नागरिकांना रशियाने बेकायदेशीपणे अटक केली असल्याचे त्यांनी म्हटले. तर, रशियातील विरोधी पक्षाचे नेते नवलनी यांच्या अटकेबाबतचाही मुद्दा उपस्थित केला. मूलभूत मानवाधिकाराच्या मुद्यांबाबत आम्ही चिंता व्यक्त करू असे बायडन यांनी म्हटले.

नवलीन यांची जागा तुरुंगातच

रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी पत्रकारांशी बोलताना अलेक्सी नवलीन यांच्या अटकेच्या मुद्यावर भूमिका मांडली. नवलनी यांनी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेची अटींचे उल्लंघन केले होते. नवलनी अटक होण्यासाठी जाणूनबुजून रशियात आले असल्याचे पुतीन यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:47 PM 17-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here