ओबीसीमधील समाजघटकांवर स्वार्थ बाजूला ठेवून संघर्ष करण्याची वेळ : विजय वडेट्टीवार

0

अलिबाग : ओबीसीमध्ये मोडणाऱ्या सर्व समाजांनी आपले स्वार्थ बाजूला ठेवून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. केवळ सत्तेचा उपभोग घेण्यासाठी राजकारण्यांनी ओबीसी समाजाचा वापर केला. संविधानाने दिलेला अधिकार हिरावून घेणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई सुरू झाली आहे. आता आपल्या न्याय्य हक्कासाठी राजकीय पक्षांबरोबर बंड करण्याची तयारी करा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाने आयोजित केलेल्या कोकण विभागीय बैठकीसाठी ते अलिबाग येथे आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर हिंदवी स्वराज्य निर्माण केले तर महामानव घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीच्या जोरावर देशाला सुराज्य मिळवून दिले. संविधानाने आणि घटनेने दिलेले अधिकार हिरावून घेणाऱ्यांच्या विरोधात आपल्याला लढा उभारायचा आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न प्रस्थापितांनी केला आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राज्याच्या सत्ताधाऱ्यांबरोबर बोलणी सुरू आहेतच. आता केंद्रात कायदेशीर लढाई देण्याची तयारी सुरू केली आहे. प्रसंगी संघर्ष करून व्यवस्थेला जेरीस आणू; परंतु ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

अठरा पगड जातींचा समूह ओबीसीमध्ये मोडतो. त्यांचे अनेक प्रश्न गंभीर स्वरूपात समोर येत आहेत. हे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ओबीसी समाजाने संघटित व्हायला हवे, असे आवाहन ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.यावेळी व्यासपीठावर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, उपाध्यक्ष राजू साळुंके, महासचिव बालाजी शिंदे, धनंजय बेडदे, ॲड. शुभांगी शेरेकर, प्रा. संजीवकुमार जाधव आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना आपत्तीमध्ये दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साईनाथ पवार यांचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:18 PM 17-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here