मानाचे पालखी सोहळे पंढरीत दाखल, पालखीतळावर ज्ञानबा-तुकारामाचा गजर

0

पंढरपूर : आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा मंगळवार 20 जुलै रोजी साजरा होतो आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सोहळा प्रातिनिधिक स्वरुपात होत असला तरी वारकऱ्यांचा उत्साह आणि जल्लोष तोच आहे. हरिनामाचा जयघोष करीत राज्यभरातून निघालेल्या मानाच्या पालखी सोहळ्यातील 400 वारकरी भाविक बसमधून सायंकाळी वाखरी पालखी तळावर दाखल झाले.

दरम्यान, आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबई येथून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर व ग्रामीण भागात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात असताना देखील वारी सोहळ्यात खंड पडू नये अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री ठाकरे घेतली होती. त्यामुळे प्रशासकीय प्रस्ताव बाजूला करीत यंदाची वारी प्रातिनिधिक स्वरुपात साजरी होते आहे.

कोरोनामुळे यंदा वारी होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह होते मात्र शेकडो वर्षाची वारी परंपरा खंडित न करण्याचा वारकऱ्यांचा आग्रह होता वारकऱ्यांचा आग्रह व परंपरा लक्षात घेऊन ठाकरे सरकारने गतवर्षीपेक्षा यंदा तगडे नियोजन केले आहे. गेल्या वर्षी फक्त दोनशे वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती तर यावर्षी चारशे वारकऱ्यांना वारीच्या या सोहळ्यात थेट सहभाग घेता येणार आहे.

मानाच्या 10 पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी देत 20 एसटी बसेसची व्यवस्था करून दिली आहे. राज्यभरातून प्रमुख संतांच्या पालख्या आज सायंकाळी वाखरी मुक्कामी दाखल झाल्या. पालखी तळावर वारकरी परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर हा पालखी सोहळा पायी चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

एकादशीनिमित्त 195 स्थानिक महाराज मंडळींना श्री विठ्ठलाच्या दर्शनाला सोडण्यात येत आहे. या व्यतिरिक्त इतर भाविक अथवा नागरिकांना पंढरपुरात येता येणार नाही. भाविकांनी पंढरपूरात येवू नये म्हणून शासनाने शहरात दि. 18 ते 25 जुलै दरम्यान कडक संचारबंदी लागू केलेली आहे. या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी 3 हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. एरवी आषाढी यात्रेला आलेल्या लाखो भाविकांची सुरक्षा करण्याचे काम हे पोलीस करीत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हेच पोलीस भाविकांना पंढरपुरात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकरीता त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पंढरपूर शहराला जोडणारे सर्वच रस्ते नाकाबंदी करुन बंद करण्यात आलेले आहेत.

पंढरीत आलेल्या भाविकांचे चंद्रभागा स्नान म्हणजे एक पर्वणीच असते. मात्र, संचारबंदी लागू करण्यात आल्याने मानाच्या पालखी सोहळ्यातील वारकरी वगळता इतरांना चंद्रभागा स्नान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ मानाच्या दहा पालख्यातील भाविकांनाच स्नान करता येणार आहे. त्यामूळे चंद्रभागेचे सर्व घाट बंद करण्यात आलेले आहेत. नेहमी गजबजणारा मंदिर परिसर रिकामा दिसत आहे. चौफळा, शिवाजी चौक, स्टेशन रोड भाविकांविना उदास दिसत आहे. चंद्रभागा नदीपात्रात स्नान करण्यासाठी भाविकच नसल्याने वाळवंट रिकामे दिसून येत आहे. तर 65 एकर येथे भक्तीसागरात ऐरव्ही प्रतिपंढरपूर वसल्यासारखे दिसते. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभुमिवर तेथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येथे तंबू, राहुट्या दिसून येत नसल्याने आषाढीत कानी पडणारे भजन, किर्तन, प्रवचन यावेळेस कानी पडलेच नाही. मठ, संस्थाने, धार्मिक संस्थाने रिकामे आहेत. त्यामुळे ऐन आषाढी एकादशीदिवशी भाविकांनी दुमदुमणारी पंढरी सुनी सुनी झाली आहे.

दरवर्षी मानाच्या पालख्यांसह शेकडो लहान मोठ्या पालख्या, दिंड्या पंढरीत दाखल होतात. एकदशीला पहाटेपासून चंद्रभागा स्नानासाठी लाखो भाविक गर्दी करतात. चंद्रभागा स्नानानंतर पदस्पर्श दर्शन तसेच मुख दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमुळे पंढरी नगरी अक्षरश: दुमदुमून जाते. मठ, धार्मिक संस्था, संस्थाने आदीमधून भजन, किर्तन व प्रवचनात दंग झालेले भाविक यामुळे आध्यात्मिक नगरीत चैतन्यमय वातावरण असते. मात्र सद्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमिवर भाविकांना पंढरीत येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ऐन एकादशीदिवशी मंदीर परिसरातील प्रासादिक साहित्याची दुकाने बंद आहेत. मंदिराचे दरवाजे बंद आहेत. मानाच्या पालख्यांना त्यांच्या मठात ठेवण्यात आले आहे. येथेही भाविक अथवा नागरिकांना दर्शनाकरीता परवानगी देण्यात आलेली नाही.

पासधारक अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त पंढरीत इतरांना प्रवेश देण्यात आलेला नाही. तर शहरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. संचारबंदीमूळे शहरात पोलीसांव्यतिरिक्त इतर कोणीही दिसून येत नाही. त्यामुळे भाविकांअभावी मंदीर परिसर, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, शहरातील रस्ते, भक्तीमार्ग, प्रदक्षिणा मार्ग, नेहमी गजबजलेला स्टेशन रोडही रिकामा असल्याने प्रातिनधीक भाविक सोडले तर भाविकांविना आषाढी एकादशी साजरी करण्यात आल्याचे चित्र दिसून आले. त्यामूळे आषाढीला असणारी भाविकांची मांदियाळी यावेळीही न दिसता भाविकांविना सुनीसुनी पंढरी दिसली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:51 PM 19-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here