पावसाच्या सरासरीत रत्नागिरी देशात दुसऱ्या क्रमांकावर

0

रत्नागिरी : देशात सर्वाधिक पाऊस मेघालयातील चेरापुंजी येथे काेसळताे. त्याखालाेखाल महाबळेश्वरचा नंबर लागताे. मात्र, यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याने महाबळेश्वरला मागे टाकले असून, हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात २१ जुलैपर्यंत रत्नागिरीत सरासरीपेक्षा सुमारे १,२०० मिलिमीटर अधिक पावसाची नाेंद झाली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने देशातील पावसाची महत्त्वाची ठिकाणे आणि प्रमुख शहरांची नाेंद जाहीर केली आहे. या नाेंदीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाने महाबळेश्वरला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. देशात मेघालय आणि आसामच्या काही विभागांमध्ये दरवर्षी मोठ्या पावसाची नोंद होते. चेरापुंजीमध्ये पडणाऱ्या पावसाने आजवर विक्रम केला आहे. त्यामुळे चेरापुंजी हे सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण गणले गेले आहे. मात्र, २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत महाबळेश्वर आणि पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटक्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त राहिले आहे. तर २०१८ आणि २०१९ या सलग दोन वर्षांत महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नाेंद झाली हाेती. मात्र, २०२०मध्ये महाबळेश्वरचा पाऊस तिसऱ्या क्रमांकावर जाऊन चेरापुंजीत पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पाऊस नोंदवला गेला. कर्नाटकातील होनावर त्यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर होते.
यावर्षी ताैक्ते चक्रीवादळापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार काेसळणाऱ्या पावसाने चेरापुंजीनंतर सर्वाधिक पावसाची नाेंद केली आहे. हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात २१ जुलैपर्यंत रत्नागिरीत सरासरीपेक्षा सुमारे १,२०० मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. चेरापुंजी मात्र अद्याप पावसाची सरासरी पूर्ण करू शकलेले नाही. रत्नागिरीत जिल्ह्यातील हर्णै (ता. दापाेली) येथे १ जूनपासून २,५०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा १,३०० मिलिमीटरने अधिक आहे. महाबळेश्वरमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी २,२०० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
2:09 PM 23-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here