जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ५ हजार सेवेकऱ्यांची महाडला स्वच्छता

0

महाड : श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ५ हजारांवर सेवेकऱ्यांनी मंगळवारी महाड येथे मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली. अनेक शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, नागरिकांची घरे स्वच्छ करून दिली. रस्ते साफ केले. यावेळी मोठ्या प्रमाणात गाळ, माती, भिजून वाया गेलेले साहित्य एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली. या मोहिमेत कचरा उचलण्यासाठी सुमारे शंभरावर डम्परची मदत घेण्यात आली. संस्थानचे मुंबई, वसई, नवी मुंबई, पालघर, ठाणे या शहरांतील सेवेकरी काल रात्री महाडला मुक्कामास आले होते. त्यांची राहण्याची, जेवणाची, नास्त्याची सोय करण्यात आली. सकाळी ८ पासूनच हे सेवेकरी महाडच्या शिवाजी चौकात सारे एकत्र जमले. त्यानंतर त्यांचे गट करून त्यांना वेगवेगळे विभाग वाटून देण्यात आले व एकाचवेळी सर्व महाडमध्ये मोहीम सुरू झाली. अतिशय नियोजनबद्ध हे काम सुरू झाले. सर्व गटांचे सुसूत्रीकरण वॉकीटॉकीद्वारे करण्यात येत होते. महाड शहरात पाणी साचल्याने घरांत, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. लोकांचे धान्यापासून सारे साहित्य भिजून खराब झाले होते. तसेच सर्व शासकीय कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी पाणी शिरून गाळ साचला होता. यावेळी नगरपालिकेची दोन कार्यालये, प्रांत कार्यालय, न्यायालाय परिसर, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, चवदार तळे, सर्व महाड शहर, खासगी रुग्णालये, विद्युत मंडळ कार्यालय, बस डेपो, मंदिरे आदी ठिकाणी स्वच्छता करून परिसर चकाचक करण्यात आला. नगरपालिकेने लगतच्या अनेक पालिका, महापालिकांकडून डम्पर मागवले होते. साधारण शंभरावर डम्परच्या सहाय्याने सर्व कचरा उचलण्यात आला. या सेवाकार्याचा अनेकांनी गौरव केला. त्यात आमदार रोहीत पवार, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी सौ. निधी चौधरी, महाड नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन पाटील, नगरसेवक डॉ. चेतन सुर्वे आदींचा त्यामध्ये समावेश होता. मुख्यकार्यकारी अधिकारी पाटील यांनी संस्थानच्या सर्व सेवेकऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने महाड येथे राबविलेले स्वच्छता अभियान अभिमानास्पद आहे. त्यांचे सेवाकार्य पाहून आम्ही भारारावून गेलो आहोत.” संस्थानची ही मोहीम सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत अखंड सुरू होती. अनेक सेवेकरी कुदळ, खोरी, पाट्या घेऊन आले होते. स्वच्छता करून कचऱ्याचे ढीगच्याढीग रस्त्यावर गोळा करण्यात आले होते. नंतर हा सर्व कचरा डम्परमध्ये भरण्यासही त्यांनी मदत केली. त्यामुळे सारे महाड शहर एका दिवसात स्वच्छ झाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:09 PM 29-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here