गोंधळ घालणाऱ्या खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम सरकारने बनवावा : रामदास आठवले

0

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरुन केंद्र सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी मोदी सरकारची बाजू मांडताना विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. “केंद्र सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. पेगॅसिसबाबतचा केंद्रावर होत असलेला आरोप बिनबुडाचा आहे”, असं रामदास आठवले संसदेत म्हणाले. यासोबतच संसदेत गोंधळ घालून काम न होऊ देणाऱ्या खासदारांचं दोन वर्षांचं निलंबन करण्याचा नियमच सरकारनं बनवला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

“केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक चर्चा न करता संसदेत गोंधळ घातल आहेत. त्यामुळे सलग ३ दिवस गोंधळ घातल्यानंतर चौथ्या दिवशी देखील खासदार आपली जागा सोडून मर्यादेबाहेर वर्तन करुन कामकाज रोखण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियमच सरकारनं बनवला पाहिजे”, असं रामदास आठवले म्हणाले. “कोणत्याही विषयावर संसदेत चर्चा व्हावी. त्यासाठीच अधिवेशनांचं आयोजन केलं जातं. एका मर्यादेपर्यंत विरोध प्रदर्शन व्हायला हवं. पण विरोधासाठी संसदेचं कामकाज रोखून धरणं कितपत योग्य आहे? त्यामुळे संसदेचा वेळ वाया जातो. यानं देशाचं नुकसान होत आहे. सलग तीन दिवसांपासून विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत आणि चौथ्या दिवशी देखील त्यांनी असंच केलं तर गोंधळ घालणाऱ्या खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करा, मग तो सत्ताधारी पक्षाचा असो किंवा मग विरोधी बाकावरचा सर्वांसाठी नियम तयार करा”, अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली.
२०२४ मध्येही मोदीच
“आगामी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत ‘खेळा’ नाही, तर मोदींच्या समर्थनाचा ‘मेळा’ होणार आहे. २०२४ साली मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार निवडून येईल”, असं म्हणत रामदास आठवले यांनी ममता बॅनर्जींनाही टोला लगावला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही. त्यामुळे मोदींसमोर कोणाचंच आव्हान नाही, असंही रामदास आठवले म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:47 PM 30-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here