फलोत्पादन योजनेंतर्गत ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत : रायगड जिल्हा कृषी अधीक्षक

0

रायगड : फलोत्पादन योजनेंतर्गत ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

ड्रॅगनफ्रूट (कमलम) हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्वपूर्ण फळ आहे. ड्रॅगनफ्रूट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सीडेन्टमुळे या फळास सुपर फ्रूट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. तसेच या फळात विविध औषधी गुण आहेत. याव्यतिरिक्त या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शियम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली, तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. तसेच या पिकाला रोग व किडीचा प्रादूर्भाव नगण्य असून पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र, मागणी निर्यात क्षमता, औषधी व पोषक मूल्य इ. बाबी लक्षात घेवून सन 2021-22 या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.

ड्रॅगनफ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मी. x 3 मी. x 25 मी. या अंतरावर खड्डे खोदून खड्डयाच्या मधोमध सिमेंट काँक्रीटचा किमान 6 फूट उंचीचा खांब व त्यावर काँक्रीटची फ्रेम बसविण्यात यावी. या सिमेंट काँक्रीट खांबाच्या एका बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.

वरीलप्रमाणे ड्रॅगनफ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पध्दत, ठिबक सिंचन, खते व पिक संरक्षण याकरीता अनुदान देय आहे. याकरीता रक्कम रू. 4.00 लाख प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून 40 टक्के प्रमाणे रक्कम रु 1 लाख 60 हजार इतके अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देय आहे. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य आहे.

तरी, ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत तसेच अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:17 AM 30-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here