राज्यात होमगार्डच्या नऊ हजार रिक्त जागा भरणार, महासमादेशक रितेश कुमार यांची माहिती

May 29, 2024 - 12:23
 0
राज्यात होमगार्डच्या नऊ हजार रिक्त जागा भरणार, महासमादेशक रितेश कुमार यांची माहिती

कोल्हापूर : राज्यात गृहरक्षक दलात (होमगार्ड) रिक्त असलेल्या ९ हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. काही गुणांनी पोलिस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल.

होमगार्डचा आहार भत्ता वाढवण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली. कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयास सोमवारी (दि. २७) भेट देऊन त्यांनी कामांचा आढावा घेतला.

राज्यात गृहरक्षक दलासाठी ५४ हजार जागा मंजूर आहेत. त्यापैकी ९ हजार जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलिस भरतीत काही गुणांनी संधी हुकलेल्या उमेदवारांना होमगार्ड होण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे अशा तरुणांनी गृहरक्षक दलात काम करावे, असे आवाहन महासमादेशक रितेश कुमार यांनी केले आहे. नवीन पद भरतीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया सुरू होईल.

सध्या होमगार्डना कामाच्या दिवसाचे ६७० रुपये मानधन दिले जाते, तर १०० रुपये आहार भत्ता दिला जातो. आहार भत्ता वाढवण्याची मागणी सुरू होती. त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, लवकरच यात वाढ होईल, असा विश्वास रितेश कुमार यांनी व्यक्त केला. बैठकीसाठी समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर समादेशक विलास पाटील, केंद्र नायक विवेक साळवे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापुरात २०० जागा रिक्त

कोल्हापुरात होमगार्डच्या एकूण २००० जागा मंजूर असून, यातील २०० जागा रिक्त आहेत. कार्यालयात १६ जागा मंजूर आहेत. यातील १० जागा रिक्त आहेत. केवळ सहा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. त्यामुळे सर्व रिक्त जागा भरण्यास महासमादेशक रितेश कुमार यांनी मंजुरी दिली.

आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण

होमगार्डना आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेषत: पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, त्यांना पाण्यातून बाहेर काढणे, मदत केंद्रांची उभारणी करणे या कामांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार लवकरच होमगार्डना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 29-05-2024


 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow