IND vs ZIM, 1ST T20I : भारताने टॉस जिंकला; टीम इंडियात तीन युवा खेळाडूंचे पदार्पण

Jul 6, 2024 - 16:03
Jul 6, 2024 - 16:06
 0
IND vs ZIM, 1ST T20I : भारताने टॉस जिंकला; टीम इंडियात तीन युवा खेळाडूंचे पदार्पण

हरारे : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात भारताने टॉस जिंकला. भारताचा कर्णधार शुभमन गिलने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पहिल्या सामन्यात भारतीय संघात तीन युवा खेळाडूना पदार्पण करण्याची संधी दिली आहे.

भारतीय संघात यावेळी अभिषक शर्मा, ध्रुव जुरेल आणि रायन पराग यांना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हे तिघे आपल्या पहिल्या सामन्यात कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

भारतीय संघ पुढील प्रमाणे : 1 शुभमन गिल (कर्णधार), 2 अभिषेक शर्मा, 3 ऋतुराज गायकवाड, 4 रियान पराग, 5 रिंकू सिंग, 6 ध्रुव जुरेल (विकेटकीपर), 7 वॉशिंग्टन सुंदर, 8 रवी बिश्नोई, 9 आवेश खान, 10 मुकेश कुमार, 11 खलील अहमद.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी नवख्या असणाऱ्या खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याला आज, शनिवारपासून सुरुवात होईल. भारत-झिम्बाब्वेदरम्यान पहिली टी-२० क्रिकेट लढत आज रंगणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-२०तून निरोप घेतला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या या 'लघूत्तम' प्रकारात नव्या दमाच्या 'टीम इंडिया'ची सवय आता भारतीय पाठीराख्यांनाही करून घ्यावी लागेल.

भारत-झिम्बाब्वेदरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. टी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक सुरू आहे. या कामगिरीतून प्रेरणा घेऊन तरुण खेळाडू भारतीय संघातून आपले नाणे खणखणीत वाजवून दाखविण्यास आतुर आहेत. सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणारा अभिषेक शर्मा आणि राजस्थान रॉयल्सचा रियान पराग यांना या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी लाभेल. झिम्बाब्वे काही कसलेला संघ नव्हे. मात्र, टी-२०चा नूर बघता प्रतिस्पर्धी संघांच्या ताकदीत फारसे अंतर दिसत नाही. आयपीएलच्या पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करणारा सिकंदर रझा झिम्बाब्वेचा हुकूमी खेळाडू आहे.

दरम्यान भारताचे शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल मालिकेतील तिसऱ्या सामन्यापासून संघात सहभागी होतील. भारतीय टी-२० संघाचा भावी कर्णधार, अशी अपेक्षा बाळगून असणारा हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव ही मंडळीही भविष्यात टी-२०च्या भारतीय संघात पुनरागमन करतील. तेव्हा या संघातील बहुतेक खेळाडूंना अंतिम अकरामध्ये संधी लाभणार नाही.

नव्या पिढीला संधी
झिम्बाब्वे दौऱ्यावर नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टी-२० वर्ल्ड कपनंतर हार्दिक पंड्या, बुमराह यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने आयपीएलमध्ये चमक दाखविणाऱ्या तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:17 06-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow