ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव

Jul 8, 2024 - 10:38
Jul 8, 2024 - 11:38
 0
ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव

हरारे : पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारतीय संघाने १-१ अशी बरोबरी साधली. झिम्बाब्बे दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने रविवारी झालेला दुसरा सामना जिंकला.

पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यात भारताच्या युवा सेनेला यश आले. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळलेल्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. भारताने दिलेल्या २३५ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान झिम्बाब्वेच्या संघाला घाम फुटला. भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना प्रतिस्पर्धी संघाला अवघ्या १३४ धावांत रोखले. यजमान संघ १८.४ षटकांत सर्वबाद केवळ १३४ धावा करू शकला अन् १०० धावांनी सामना गमावला.

झिम्बाब्वेकडून वेस्ले मधेवी वगळता एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही, त्याने १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३९ चेंडूत ४३ धावा केल्या. भारताकडून आवेश खान आणि मुकेश कुमार यांनी ३-३ बळी घेतले, तर रवी बिश्नोई (२) आणि वॉशिंग्टन सुंदरला (१) बळी घेण्यात यश आले.

तत्पुर्वी, अभिषेक शर्माने स्फोटक खेळी करताना ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४६ चेंडूत शतक झळकावले. अभिषेकने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्या १३ चेंडूत शतकाला गवसणी घातली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत २ बाद २३४ धावा केल्या. झंझावाती शतक झळकावून अभिषेक शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. शतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. अभिषेकने गायकवाडसोबत दुसऱ्या गड्यासाठी १३७ धावांची भागीदारी नोंदवली. ऋतुराज गायकवाडने सुरुवातीला संथ गतीने धावा केल्या. मग त्याच्या गाडीने वेग पकडताना धावगती वाढवली. ऋतुराज ४७ चेंडूत ७७ धावा करून नाबाद परतला, त्याला ११ चौकार आणि १ षटकार मारण्यात यश आले. अखेरच्या काही षटकारांमध्ये रिंकू सिंगने स्फोटक खेळी केली. त्याने ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २२ चेंडूत ४८ धावांची शानदार खेळी केली. ऋतुराज आणि रिंकू ही जोडी नाबाद परतली. विशेष बाब म्हणजे भारताने शेवटच्या १० षटकांत १ गडी गमावून तब्बल १६० धावा कुटल्या. शतकवीर अभिषेक शर्माला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतीय संघ -
शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन (पदार्पण), रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 08-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow