रत्नागिरी : ३४८ नवशिक्षकांच्या कागद पडताळणीला सुरुवात

Jul 10, 2024 - 14:36
 0
रत्नागिरी : ३४८ नवशिक्षकांच्या कागद पडताळणीला सुरुवात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेला पुन्हा नव्याने ३४८ शिक्षक मिळाले आहेत. मंगळवारी या सर्व उमेदवारांची कागदपत्र तपासणी जि. प. भवनात सुरू झाली आहे. बुधवारी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यानंतर समुपदेशनाद्वारे या उमेदवारांना शाळा दिली जाणार आहे.

जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारली आहे. हे गेल्या चार-पाच वर्षांत दिसत आहे. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये रत्नागिरी जिल्हा हा राज्यात अव्वळ ठरला होता. मात्र, रिक्त पदांची संख्या वाढत निघाल्याने शैक्षणिक कारभार चालवताना जि. प. प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. चालू वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संख्येमुळे जवळपास २ हजार पदे रिक्त होती. मात्र, शासनाने १ हजार पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार मे महिन्यात ९९७ शिक्षकांची भरती झाली. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाला दिलासा मिळाला होता.

ही भरती झालेली असतानाच जुलैच्या पहिल्या आठवडयात पुन्हा ३४८ शिक्षकांना पवित्र पोर्टलवरून भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार या शिक्षकांची कागदपत्र पडताळणी मंगळवार, बुधवारी जि. प. भवनात आयोजित करण्यात आली आहे.

आठ दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार
पहिल्या दिवशी २१६ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची पडताळणी बुधवारी करण्यात येणार आहे. कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या उमेदवारांसाठी समुपदेशन आयोजित करण्यात येणार आहे. यानंतर त्यांना शाळा देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ८ दिवसांत पूर्ण होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow