निरोपाचे भाषण अर्ध्यावर सोडून शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं पळून

Aug 5, 2024 - 16:57
 0
निरोपाचे भाषण अर्ध्यावर सोडून शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं पळून

ढाका : बांग्लादेशात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले आरक्षणविरोधीआंदोलन आणखी तीव्र झाले आहे. हजारो आंदोलकांनी आज पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसून खूप नासधूस केली.

अशातच, देशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आज(दि.5) आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडून भारतामध्ये आश्रय घेण्यासाठी रवाना झाल्या आहेत. शेख हसिना आणि त्यांची बहीण रेहाना लष्करी हेलिकॉप्टरने भारतात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

बांग्लादेशच्या स्थानिक मीडियानुसार, शेख हसीना भारताच्या दिशेन रवाना झाल्या आहेत. दरम्यान, बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर आता लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांच्याकडे देशाची जबाबदारी आली आहे. त्यांनी लवकरच देशात अंतरिम सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे.

हसीना यांना देश सोडण्यापूर्वी भाषण रेकॉर्ड करायचे होते, पण...
बांग्लादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेख हसीना यांना देश सोडण्यापूर्वी त्यांचे निरोपाचे भाषण रेकॉर्ड करायचे होते. मात्र, अचानक परिस्थिती बिघडली, ज्यामुळे त्यांना आपले भाषण अर्ध्यावर सोडून देश सोडून पळून जावे लागले. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येतोय की, देशाच्या लष्कराने हसीना यांना देश सोडण्यासाठी 45 मिनिटांची नोटीस दिली होती.

लष्करप्रमुख काय म्हणाले?
दरम्यान, शेख हसिना यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी देशाला संबोधित केले आहे. आपल्या भाषणात हिंसाचार थांबवण्याचे आवाहन करताना त्यांनी हिंसाचारात मारल्या गेलेल्यांना न्याय दिला जाईल असे सांगितले. तसेच, देशातील कर्फ्यू हटवण्याची घोषणा करताना सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले.

भारत-बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी
बांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. याबाबत बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. बीएसएफचे डीजीही कोलकाता येथे पोहोचले आहेत. बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था लष्कराच्या हातात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा 4096 किलोमीटर लांब आहे. बीएसएफने सर्व सीमेवर अलर्ट जारी केला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:25 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow