"हे दुर्दैवी असलं तरी आम्हाला आशा आहे की..."; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या १२ व्या दिवशी भारतासाठी मोठी निराशाजनक बातमी समोर आली. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइलमध्ये स्थान मिळवले होते.
विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आल्यामुळे भारताच्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या आहेत. आवश्यक मर्यादेपेक्षा केवळ १०० ग्राम वजन अधिक असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आलं आहे. विनेश फोगटला अपात्र ठरवल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनेशने वजन कमी करण्यासाठी रात्रभर मेहनत केली होती. मात्र तिचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. विनेशला अपात्र ठरवल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"विश्वविजेत्या कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठणारी भारताची शान विनेश फोगटला तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरवण्यात आले, हे दुर्दैवी आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना या निर्णयाला जोरदार आव्हान देईल आणि देशाच्या कन्येला न्याय देईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. विनेश हिम्मत गमावणारी नाही, ती आणखी मजबूतपणे रिंगणात परतेल असा आम्हाला विश्वास आहे. विनेश तू नेहमीच देशाचा अभिमान वाढवला आहेस. आजही संपूर्ण देश तुझी ताकद म्हणून तुमच्या पाठीशी उभा आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
What's Your Reaction?