गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई-कुडाळ विशेष ट्रेन धावणार
मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईतून चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणातील आपल्या गावी जात असतात. गणेशोत्सवाच्या काळात गावी जाण्यासाठी रेल्वे, एसटी आणि खासगी वाहने उपलब्ध असतात.
जे चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार आहेत, त्यांच्यासाठी कोकण रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-कुडाळ- मुंबई अनारक्षित विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं ज्यांना अद्याप रेल्वेच्या नियमित गाड्यांचं आरक्षण मिळालेलं नाही त्यांना या गाडीचा फायदा होऊ शकतो.
मुंबई-कुडाळ-मुंबई विशेष ट्रेन कधी सुटणार?
रेल्वे क्रमांक 01103/ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुडाळ ही गाडी मुंबईहून दुपारी साडेतीन वाजता आज म्हणजेच 4 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबरला सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता ही गाडी कुडाळला पोहोचेल.
कुडाळ रेल्वे क्रमांक 01104 कुडाळ- मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी कुडाळ येथून 5 आणि 7 सप्टेंबरला पहाटे साडे चार वाजता सुटेल आणि मुंबईत त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल.
कोणत्या स्थानकांवर गाडी थांबणार?
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामाठे, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या स्थानकांवर ही विशेष ट्रेन थांबणार आहेत.
या गाडीला एकूण 20 कोच असतील त्यापैकी 14 कोच जनरल असतील चर चार कोच स्लीपरचे असतील. या गाडी संदर्भात अधिक माहितीसाठी रेल्वेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ही गणपती विशेष ट्रेन अनारक्षित असल्यानं याची तिकीट आयरसीटीसीच्या तिकीट बुकिंग वेबसाईटवर उपलब्ध होणार नाहीत. ती यूटीएस अॅप किंवा रेल्वे स्टेशनवरील तिकीट बुकिंगच्या खिडकीवर मिळतील.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्यानं चाकरमान्यांचं नियोजन बिघडलेलं आहे. एसटी कर्मचार्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं मुंबई- कुडाळ गणपती विशेष ट्रेन चालवण्याचा घेतलेला निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 04-09-2024
What's Your Reaction?