समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चांगला पर्याय महाराष्ट्रासमोर देणार : संभाजीराजे छत्रपती
मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडी हे एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला पर्याय म्हणून आम्ही पुढे येत आहोत. सामान्य व्यक्तीला त्यांच्या हक्काचं बटण देण्याचं काम आम्ही करणार आहोत.
मुंबईत छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिलाय का हे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. या ७५ वर्षात नुसत हेवदावे सुरू आहे. महाराष्ट्र कसा घडवू शकतो?, महाराष्ट्र इतरांना दिशा देण्याचं काम करतो. सध्या लोक अस्वस्थ आहेत. लोकसभेत जनतेनं जो निर्णय दिला त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. मागील १५-२० दिवसांत जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय, ज्यातून सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेन आमचा प्रवास सुरू झाला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच प्रहारचे बच्चू कडू यांच्यासोबतही आमची बोलणी सुरू आहेत. काही मुद्द्यांवर एकमत होण्यासाठी आणखी २ बैठका घ्याव्या लागतील. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतु राजरत्न आंबेडकर आमच्यासोबत आलेत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने पुढे जायचे आहे. जय जवान, जय किसान पक्ष आमच्यासोबत आला आहे. ही चांगली सुरुवात आहे. राजू शेट्टींसोबत आमचे बोलणे सुरू आहे. शेतकऱ्यांचे सगळे घटक कसे येतील, वेगळा पर्याय देता येईल यावर चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक बोलणी झाली. आपल्याला पाडायचं नाही तर निवडून कसं आणता येईल यावर बोलणं झालं. त्यांचा उद्देश आणि आमचा उद्देश एकच आहे. गरीब मराठ्यांनाही आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे. जरांगे सकारात्मक निर्णय घेतील ही अपेक्षा आहे असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं.
दरम्यान, निवडणूक लांबल्या आहेत, पुढची तारीख अजून जाहीर झाली नाही. जितके चांगले लोक आम्हाला जोडले जातील त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी, मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांशीही संवाद सुरू आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चांगला पर्याय महाराष्ट्रासमोर देणार आहोत. जरांगे पाटील सध्या सगळ्यांचा अंदाज घेतायेत. ते सकारात्मक निर्णय घेतील. महायुती, महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून आम्ही नवा पर्याय लोकांसमोर देणार आहोत अशी माहिती संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत दिली.
अनुसूचित जातीतील लोक अन् मुस्लिमांची फसवणूक
आज जे काही महाराष्ट्रात बघत आहोत, बाबासाहेबांचा इतिहास वाचला तर लहानपणी ते चाळीत राहायचे, रात्री २ ते पहाटे ५ पर्यंत ते अभ्यास करत होते. कारण ५ वाजता पाणी यायचे, तेव्हा नळावरची भांडणे सुरू व्हायची. त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा. आज महाराष्ट्रात नेमकी तीच परिस्थिती आहे. नळावरची भांडणे सुरू आहेत. जोडेमारो आंदोलन, वैयक्तिक द्वेषातून हे सगळे सुरू आहे. लोकसभेत संविधान धोक्यात आहे असा प्रचार केला गेला, भारताचे संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिले. परंतु ज्यावेळी खरेच जेव्हा संविधानाला धोका आहे, मग वक्फ बोर्डाचा मुद्दा असो, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्न असो कुणीही एक प्रश्न विचारत नाही. अनुसूचित जातीतील, मुस्लीम समाजाला आज त्यांची फसवणूक झालीय असं वाटायला लागलं आहे. महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणि मविआ हटवायचे असेल तर महायुती आणा हा जो खेळ सुरू आहे तो थांबला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला एक पर्याय म्हणून नवीन समीकरण पुढे येत आहे असं विधान राजरत्न आंबेडकरांनी यावेळी पत्रकार परिषदेत केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 05-09-2024
What's Your Reaction?