रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांनी गृहनिर्माण, गृहतारण सहकारी संस्था मतदारसंघातून अर्ज भरला होता. त्यांच्याविरोधात एकही अर्ज न आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता असून अधिकृतपणे याची घोषणा २५ ऑक्टोबरला होईल. गेली वीस वर्षे जिल्हा बॅंकेवर संचालक असलेले अॅड. पटवर्धन यांचे सहकारातील काम वाखाणण्याजोगे असून त्यांनी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे. ते महाराष्ट्रातील अग्रणी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष असून सहकारातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांची बिनविरोध होण्याची शक्यता आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत श्री. पटवर्धन यांच्यासह सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा आणि विविध कार्यकारी सेवा संघ मतदारसंघात चिपळूण येथून विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, खेड येथून बाबाजी जाधव, संगमेश्वरमधून राजेंद्र सुर्वे, दापोलीतून सुधीर कालेकर तसेच राखीव मतदारसंघातील अनुसूचित जाती, जमातीतील सदस्यमधून विद्यमान संचालक जयवंत जालगावकर हे उमेदवार बिनविरोध निवडून येतील. त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल केलेले नाहीत. दरम्यान, या निवडणुकीत २१ जागांसाठी ८८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची मुदत काल संपली असून येत्या सोमवारी अर्जांची छाननी होणार आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी बँकेची निवडणूक होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:51 PM 23-Oct-21
