भांडुप : भांडुप पोलीस ठाण्यात एका गुंडाचा वाढदिवस साजरा करणे पाच पोलीस कर्मचार्यांना महागात पडले आहे. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक पंकज शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन कोकरे, पोलीस नाईक अनिल गायकवाड, पोलीस शिपाई मारुती जुमाडे यांना मंगळवार दि 30 रोजी निलंबित करण्यात आले असून पोलीस हवालदार सुभाष घोसाळकर यांची बदली शस्त्रविभागात करण्यात आली आहे. 23 जुलै रोजी भांडुप येथील सोनापूर विभागात राहाणार्या आयन उर्फ उला खान याचा वाढदिवस भांडुप पोलीस ठाण्याच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर भांडुप पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी साजरा केला होता. अयानने याचा व्हिडीओ स्वतःच्या व्हॉटस अॅप स्टेटसवर देखील ठेवला होता. उला खान याच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात मारहाण आणि अपहरणाचे गुन्हे दाखल असून यात एका गुन्ह्यात तो निर्दोष सुटल्याचे, तर दुसर्यात त्याची बी समरी म्हणजे हेतूपूर्वक त्याला अडकवले जात असल्याचे सिद्ध झाले आहे असे भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार भांडुप पोलिसांचा तो खबरी असल्याने त्याच्यावर पोलिसांचा वरदहस्त आहे. त्याचा गैरफायदा घेऊन तो विभागात दादागिरी देखील करीत असे. तो पोलिसांसाठी कलेक्शनही करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक त्याच्यावर करीत आहेत. अशा व्यक्तीचा भांडुप पोलिसांनी वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच भांडुपमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे हा वाढदिवस साजरा करणार्यांवर वरिष्ठांनी कारवाई करीत चार जणांना निलंबित तर एकाची बदली केली आहे. या कारवाई नंतर भांडुपवासीयांनी वरिष्ठ अधिकार्यांचे कौतुक केले असून भांडुपमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. गेले काही महिने भांडुपसह संपूर्ण परिमंडळ सातमध्ये होणारे खून, चोर्या आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावर देखील पोलीस आयुक्तांनीच आता थेट उपाय करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
