आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या समोर नाराजी व्यक्त करणारे भास्कर जाधव समोर आले. पण नाराज असणारे ते एकटे नाहीत. आता अजून एक आमदार नाराज असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्यात विधासभा अस्तित्वात आल्यापासून पंढरपूरच्या आमदाराला एकदाही मंत्रीपद मिळाले नाही. माझी संधी मिळता मिळता हुकली. पंढरपूरला मंत्रीपद न मिळण्याचा शाप आहे,अशी उद्विग्न भावना राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांनी व्यक्त केली आहे. आमदार भारत भालके हे पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा हा कारखाना यंदा बंद आहे. कारखाना बंद असल्याने ते शेतकरी,कामगार आणि विरोधकांचे एकाच वेळी टीकेचे धनी झाले आहेत. भालके म्हणाले, पंढरपूर हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. परंतु एकदाही पंढरपूरला मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. यावेळी मला संधी होती. परंतु मीच मंत्रीपदापेक्षा कारखान्याला मदत करा, असे सांगितले. यापुढच्या काळात पंढरपूरचा टोपीवाला आमदारच मंत्री होईल. त्यांनी हुकलेल्या मंत्रिपदाविषयी हळहळ व्यक्त करत आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. विधान सभा निवडणुकीआधी ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यावेळी त्यांनी भाजप मध्ये जाण्याचा मनोदय सुद्धा व्यक्त केला होता.
